शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मराठ्यांची टांगती तलवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

मुंबई - शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या दसरा मेळाव्यावर यंदा मराठा समाजाच्या नाराजीची टांगती तलवार आहे. "सामना‘मधील कथित व्यंग्यचित्राबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाहीर माफी मागणे टाळत असल्याने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी दसरा मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याची रणनीती आखली जात असल्याचे समजते. 

मुंबई - शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या दसरा मेळाव्यावर यंदा मराठा समाजाच्या नाराजीची टांगती तलवार आहे. "सामना‘मधील कथित व्यंग्यचित्राबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाहीर माफी मागणे टाळत असल्याने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी दसरा मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याची रणनीती आखली जात असल्याचे समजते. 

राज्यभरात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांशी बांधिलकी असणारेही या मोर्चांमध्ये आहेत. या मोर्चांमध्ये शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे शिवसेनेचे आमदार आणि स्थानिक नेते मान्य करत आहेत. मात्र, "सामना‘मध्ये छापून आलेल्या व्यंग्यचित्रामुळे बिथरलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेलाच धडा शिकवण्याचा निश्‍चय केला आहे. त्यासाठी दसरा मेळाव्यात सहभागी न होण्याचे संदेश व्हॉट्‌सऍपवरून शिवसैनिकांकडूनच पाठवले जात आहेत. व्यंग्यचित्रावरून जाहीर माफी मागण्याचे टाळणाऱ्या उद्धव ठाकरे आणि "सामना‘चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविषयीची नाराजी शिवसैनिक खासगीत व्यक्‍त करू लागले आहेत. मेळाव्याला उपस्थित न राहता ही नाराजी जाहीर करण्याचा विचार शिवसैनिक करीत आहेत.  

शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यापासून लाखोंच्या गर्दीची नेहमीच चर्चा होते. शिवसैनिकांच्या या गर्दीमध्ये कुठल्या एखाद्या जाती समूहाचे वर्चस्व नसणे हेच या गर्दीचे वैशिष्ट्य नसले, तरी मेळाव्याला भरभरून प्रतिसाद देणाऱ्यांमध्ये कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मोठी संख्या असते. मात्र, मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघत असलेल्या मोर्चांनंतर सर्वच राजकीय पक्षांमधील जातींचे वजन वाढले आहे. "सामना‘च्या व्यंग्यचित्राच्या निमित्ताने शिवसेनेतील मराठा समाजाला प्राबल्य दाखविण्याची संधी चालून आली आहे. याविषयी शिवसैनिकांनी सोशल मीडियावरून चर्चा सुरू केली असून, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मराठ्यांनी उपस्थित राहू नये, अशा प्रकारचे संदेश व्हॉट्‌सऍपवरून मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.