शिवाजीनगर आगाराचा भूखंड आरटीओला भाड्याने

शिवाजीनगर आगाराचा भूखंड आरटीओला भाड्याने

मुंबई - चेंबूरमधील ‘बेस्ट’च्या शिवाजीनगर आगाराचा मोकळा भूखंड आरटीओला टेस्टिंग ट्रॅकसाठी दोन वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा निर्णय मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला. रेडीरेकनर दरानुसार पैसे न देता कमी भाडे देत असल्याने तसेच पाच वर्षांनंतर हा भूखंड बेस्टकडे परत येण्याची शाश्‍वती नसल्याचे कारण देत समितीच्या सदस्यांनी हा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी फेटाळला होता. त्याबाबतचा सुधारित प्रस्ताव मंगळवारी मंजूर झाला. 

१९८१ मध्ये शिवाजीनगर आगार उभारले गेले होते. तेथील अर्ध्या जागेचा वापर आगारासाठी होतो, तर काही जागेवर निवासी इमारती आहेत. तेथील २७ हजार चौरस मीटर जागेवर शिवाजीनगर आगार-२  बांधण्याचे बेस्टने प्रस्तावित केले होते. या भूखंडावरील सात हजार चौरस मीटर जागा पाच वर्षांसाठी टेस्टिंग ट्रॅकसाठी भाड्याने देण्याची मागणी आरटीओने बेस्टकडे केली होती. त्यापोटी बेस्टला प्रति महिना पाच लाख मिळणार होते; मात्र हा दर सध्याच्या रेडीरेकनरनुसार नसल्याचे सांगत बेस्ट समिती सदस्यांनी प्रस्तावाला विरोध केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार म्हणाले, नियमित बेस्टच्या परिवहन विभागाला आरटीओ विभाग बरीच मदत करत असतो. बेस्ट उपक्रमाने अनेक वर्षांपासून सरकारकडे पथकर भरलेला नाही. त्याची थकीत रक्कम ५०० कोटी आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आरटीओला तत्काळ टेस्टिंग ट्रॅकची आवश्‍यकता असल्याने त्यांनी हा प्रस्ताव बेस्टकडे पाठवला आहे. आधी केवळ दोन लाख रुपये भाडे देण्यास आरटीओ तयार होते; मात्र नंतर त्यांनी पाच लाख देण्याचे मान्य केले. पाच वर्षांऐवजी आता दोन वर्षांसाठीच हा भूखंड आरटीओला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने सुधारित प्रस्ताव दिल्याने बेस्ट समितीने मंजूर केल्याची माहिती  बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी दिली.

मानखुर्द जोड रस्त्यावर पूल उभारण्यासाठी, पुलाचे सामान ठेवण्यासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी बेस्टकडे संबंधित भूखंडाची मागणी केली होती. पुलाचा कंत्राटदार बेस्टला सध्याच्या रेडीरेकनरनुसार भाडे देणार होता. प्रस्ताव मंजूर झाला, मात्र त्यानंतर कोणालाही न सांगता बेस्ट महाव्यवस्थापकांनी पालिका आयुक्तांना सांगून मंजूर प्रस्ताव परस्पर मागे घेतला. त्याची कल्पना बेस्ट समिती सदस्यांना देण्यात आली नव्हती. हा सभागृह आणि बेस्ट समितीचा अपमान असून त्याची चौकशी करावी. 
- अनिल कोकिळ, माजी अध्यक्ष, बेस्ट समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com