मुंबईत पुन्हा युती "नको रे बाबा'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

शिवसेना-भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांची नेत्यांना विनवणी

शिवसेना-भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांची नेत्यांना विनवणी
मुंबई - शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा स्वबळावर गाठता येणार नाही, असे विविध मतदानोत्तर चाचण्यांमधून समोर येते आहे. त्यामुळे निकालानंतर या दोन पक्षांना पालिकेच्या सत्तेसाठी एकमेकांची मदत घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. पण गेला महिनाभर ज्यांच्याविरोधात "आगपाखड' करत मते मागितली, आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे, या कल्पनेने दोन्हीकडील कार्यकर्ते "अस्वस्थ' झाले आहेत. म्हणूनच "पुन्हा युती नकोच' अशी प्रतिक्रिया या सामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. जागावाटपाचे गणित फिसकटल्याने यंदाच्या निवडणुकीत दोन्हीही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे "स्टार प्रचारक' म्हणून आघाडीवर होते. या दोघांनी एकमेकांवर केलेल्या थेट आरोपांमुळे कार्यकर्त्यांनाही "बळ' मिळाले. त्यामुळे घरोघरी प्रचाराला जाताना कार्यकर्त्यांनीही विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र आता मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज आल्यावर कार्यकर्ते भानावर आले आहेत.

"20 वर्षांपासून युतीमध्ये बांधले गेल्याची भावना सामान्य शिवसैनिकांची होती. त्यामुळे अनेकदा भाजपचे चुकीचे निर्णयही सहन करावे लागत होते. महिनाभरापूर्वी युती तुटल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. ते जोमाने कामाला लागले. पण आता महिनाभर ज्यांना "लाखोल्या' वाहिल्या त्यांच्यासोबत पुन्हा युती झाली तर जनतेला कसे सामोरे जाणार? अशा संभ्रमात शिवसैनिक पडले आहेत', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक 175 चे उमेदवार मंगेश सातमकर यांनी व्यक्त केली आहे. मात्र युतीबाबात अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"उद्धव ठाकरे यांनी तसेच "सामना'तून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांनी प्रचार कार्यात झोकून दिले. त्यामुळे आता विरोधी बाकांवर बसायला लागले तरी चालेल, पण शिवसेनेसोबत समझोता नको,' असे व्यक्तिगत मत भाजपचे माजी उपमहापौर आणि उमेदवार मोहन मिठबावकर यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक भविष्यात भाजपला युती करण्याची गरजच उरणार नाही, असेही मिठबावकर म्हणाले.