पुन्हा युती कर्मकठीण

पुन्हा युती कर्मकठीण
महापौरपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये खेचाखेची
मुंबई - शिवसेना आणि भाजपला समान यश मिळाल्यामुळे मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. महापौरपदामुळे शिवसेना भाजपची युती होणे अवघड आहे. सध्या शिवसेनेने महापौरपदावरच लक्ष केंद्रीत केले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर राहायचे की नाही, याचा निर्णय शिवसेना घेऊ शकते.

शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत दोन जागांचा फरक आहे. शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. दोन नगरसेवकांनी शिवसेने पाठिंबा दिला आहे. भाजपचे 82 नगरसेवक आहेत. त्यांना एका अपक्षाने पाठींबा दिला आहे. दोन नगरसेवक कमी असल्याने भाजप मुंबईच्या महापौरपदावरील दावा सोडण्यास तयार नाही. महापौरपद स्वत:कडे ठेवून शिवसेनेला स्थायी समिती देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र, स्थायी समिती बरोबरच महापौरपद स्वत:कडे ठेवणे हा शिवसेनेच्या अहंकारांशी संबंधित प्रश्‍न आहे. त्यामुळे शिवसेना हा दावा सोडण्यास तयार नाही. युती होण्यात महापौरपद हाच मोठा अडसर आहे.

सध्या महापौरपद मिळवण्यास शिवसेनेचे प्राधान्य आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेला हादरा देण्याचा विचार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तुर्तास बाजूला ठेवला आहे, असे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेश, पंजाबच्या निकालानंतर शिवसेना राज्य सरकारचा पाठींबा काढण्याचा विचार करू शकते. मात्र, सध्याच्या परीस्थीतीत राज्याच्या सत्तेत राहाणे राजकीयदृष्ट्या शिवसेनेला परवडणारे नाही, असे सांगण्यात येते.

24 वर्षांनी अमराठी महापौर ?
भाजपच्या नेत्यांनी राज्यातील सत्तेच्या आधारावर मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मन वळवू शकतात. तसे झाल्यास दोन दशकांनंतर मुंबईत अमराठी महापौर होऊ शकतो. ती माळ मनोज कोटक यांच्या गळ्यात पडू शकते. याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी सांगितले. कॉंग्रेसचे आर. आर. सिंह हे 1993 मध्ये अमराठी महापौर झाले होते. त्यानंतरचे सर्व महापौर मराठी होते.

मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला हवा. पण हा आकड्यांचा खेळ आहे. आमचे आकडे जमले तर आम्ही तडजोड करणार नाही, भाजपचाच महापौर असेल. काही अपक्ष नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार
मिलिंद वैद्य, राजूल पटेल, शुभदा गुडेकर, मंगेश सातमकर, यशवंत जाधव, विश्‍वनाथ महाडेश्‍वर, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे

भाजपचे महापौरपदाचे उमेदवार
मनोज कोटक, राम बारोट, उज्वला मोडक, शैलजा गिरकर, अलका केरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com