रंगणार आकड्यांचा खेळ!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर शिवसेना-भाजपचा काडीमोड होणार की अपरिहार्य राजकीय परिस्थितीमुळे हे पक्ष पुन्हा गळ्यात गळे घालणार, राज्य सरकारच्या स्थैर्यावर निकालाचा परिणाम होणार का, हे जाणून घेण्याचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे. आम्हीच जिंकणार, असा दावा उभय पक्षांचे नेते करत असले, तरी मतदारराजाने कोणालाच बहुमत न दिल्यास राजकीय पक्षांना सत्तेसाठी कोणती समीकरणे जुळवावी लागतील, याबाबतच्या शक्‍यतांचा हा ऊहापोह...

1) शिवसेना शंभरच्या आसपास राहिल्यास...
शिवसेनेला शंभरच्या आसपास, भाजपला 60-65 जागांवर समाधान मानावे लागल्यास दोन्ही पक्षांच्या संख्याबळात 30-40 नगरसेवकांचा फरक असेल; मात्र अशा परिस्थितीत शिवसेनेला पालिकेवर पुन्हा भगवा फडकावता येईल. समित्यांमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यावर काही प्रमाणात परिणाम होईल. अशा परिस्थितीत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना घेऊ शकेल. सरकारमधून बाहेर न पडल्यास शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते.

भाजपला 100 च्या आसपास जागा राहिल्यास भाजपला शंभरच्या आसपास तसेच शिवसेनेला 60 ते 65 जागांवर समाधान मानावे लागल्यास शिवसेनेच्या राज्यातील राजकारणावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकारचा पाठिंबा काढण्याचे धाडसी पाऊलही हा पक्ष उचलू शकतो. तसे न करता सत्तेला चिकटून राहिल्यास या पक्षाला भाजपकडून वारंवार अपमानाला सामोरे जावे लागू शकते.

स्पष्ट बहुमत नसल्यास
बहुमताचा 114 हा जादूई आकडा गाठण्यास 10-20 जागांचा फरक असल्यास दोन्ही पक्षांसमोर पुन्हा एकत्र येण्याखेरीज पर्याय नसेल; मात्र त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसू शकतो. भाजपकडून मानहानी होत असल्याने युती तोडली, असे शिवसेनेने प्रचारात उच्चरवाने सांगितले होते. त्यामुळे हे पाऊल उचलल्यास शिवसेनेकडील नाराज मतदार पुन्हा मनसे अथवा दुसरा पर्याय स्वीकारू शकतात.

मनसे-सपची चंगळ
निकाल काही लागला तरी मनसे आणि समाजवादी पक्षाची चंगळच होणार आहे. समाजवादी पक्षाने आजवर शिवसेनेला छुपी मदत केली आहे. महापौर तसेच अन्य समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी सपचे नगरसेवक गैरहजर असतात. त्याचा फायदा त्या पक्षाच्या नगरसेवकांना अर्थसंकल्पात जादा निधी मिळण्यात होतो. यंदा मनसेचे 10 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे अवघड आहे. शिवसेना किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास तसेच पुन्हा युती न करण्यावर हे पक्ष ठाम राहिल्यास, सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्यासमोर मनसे आणि सपची छुपी मदत घेण्याशिवाय पर्याय नसेल. तशी परिस्थिती या पक्षांसाठी वेगळ्या अर्थाने सुगीचे दिवस आणणारी असेल.

Web Title: shivsena-bjp municipal election result