शाखाप्रमुख-आमदारामध्ये उद्धव ठाकरेंसमोरच तू तू मैं मैं

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून शाखांशाखामध्ये धुमसणारा अंतर्गत कलह उफाळून येऊ लागला आहे. याची प्रचिती रविवारी (ता. 8) चेंबूरमध्ये आली.

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून शाखांशाखामध्ये धुमसणारा अंतर्गत कलह उफाळून येऊ लागला आहे. याची प्रचिती रविवारी (ता. 8) चेंबूरमध्ये आली.

चेंबूर येथील शिवसेना शाखा क्रमांक 146मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच आमदार प्रकाश फातर्पेकर आणि शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांच्यात तू तू मैं मैंचा एपिसोड सादर झाल्याने तेही सर्द झाल्याचे समजते. या दोघांमधील वाद पक्षप्रमुखांसमोरच चव्हाट्यावर आल्यामुळे तेथे असलेले खासदार राहुल शेवाळे आणि विभागप्रमुख मंगेश सातमकर यांना दरदरून घाम फुटला; मात्र "साहेब' समोर असल्याने काय बोलावे या पेचात ते अडकले होते, असे खात्रीलायकरित्या समजते.

उद्धव यांनी मुंबईतील शाखांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. चेंबूरच्या 146 क्रमांकाच्या शाखेत ते रविवारी आले होते. शाखेतील कामाचा आढावा घेताना शाखाप्रमुख चव्हाण यांनी कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना दाखवला. त्यावर, "हा अहवाल फेक आहे. अशी काही कामेच झाली नाहीत, असा टोमणा आमदार फातर्पेकर यांनी सर्वांसमोर चव्हाण यांना लगावला. त्यावर, त्यांच्याकडे उद्धव यांनी एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि काहीही बोलणे टाळले, असे सांगण्यात येते.

त्यानंतरचे दृश्‍य होते ते फातर्पेकर आपल्या नगरसेवक मुलीच्या कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना दाखवतानाचे. त्यांनी अहवाल उघडताच शाखाप्रमुख चव्हाण यांनी हिशोब चुकता केला. "हा अहवाल फेक आहे,' असे विधान त्यांनी खास शिवसेना स्टाईलमध्ये केले. त्यावर उद्धव यांनी त्यांच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि बोलणे टाळले, असे समजते.
शाखाप्रमुख आणि आमदारामधील हा वाद साहेबांसमोरच चव्हाट्यावर आल्याने खासदार शेवाळे आणि विभागप्रमुख सातमकर यांची पाचावर धारण बसली. काय बोलावे? तेच कळेना. साहेबांसमोर काही बोलता येत नसल्याने ते गेल्यानंतर त्यांनी शिवसेना स्टाईलने आमदार आणि शाखाप्रमुखांना "डोस'पाजल्याचे समजते. या प्रकाराची चर्चा चेंबूरमध्ये सुरू आहे.