मुंबई - मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला शिंदे यांनी फेटाळून लावले आहे.
या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला, त्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्या वेळी भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत झालेली ही भेट अचानक झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिशिर शिंदे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजानामा दिला आहे. आता ते मनसेत कुठल्याच पदावर कार्यरत नाहीत. मुंबई महापालिका निवडणूक 2017 च्या निकालानंतर शिशिर शिंदे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. शिशिर शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात चर्चा सुरू झाली होती.
|