ठाण्याच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 131 पैकी 67 जागा जिंकून शिवसेनेने एकहाती विजय मिळवला. महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचेच रमाकांत मढवी विराजमान झाले.

ठाणे - शिवसेना-भाजप युतीची 25 वर्षे सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेवर यंदा प्रथमच शिवसेनेची एकहाती सत्ता आली असून, ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

शिवसेनेचे नवनिर्वाचित शिलेदार आज (सोमवार) महापौर-उपमहापौरपदी विराजमान होत आहेत. महापालिका मुख्यालयात हा पदग्रहण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याने अवघे 'ठाणे' शिवसेनामय झाले. पालिका मुख्यालयाला तर भगवा साज चढवण्यात आला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर झूल पांघरलेल्या गजराजांच्या चार प्रतिकृती स्वागतासाठी तैनात असून छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळाही उपस्थितांचे लक्ष वेधत होता. 
 
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 131 पैकी 67 जागा जिंकून शिवसेनेने एकहाती विजय मिळवला. महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचेच रमाकांत मढवी विराजमान झाले.  संपूर्ण शहरात ठिकठिकाणी फलक आणि भगवे झेंडे लावले आहेत. सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप देण्यात आले आहे.