कुसुमाग्रजांच्या कवितेला श्रीराम लागूंचा आवाज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - कवितांचे शब्द कुसुमाग्रजांचे आणि त्यांना श्रीराम लागूंच्या आवाजाचे कोंदण, असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे तो कुसुमाग्रजांच्या "प्रवासी पक्षी'च्या निमित्ताने. या काव्यसंग्रहाची विशेष आवृत्ती "कवितेच्या पलीकडे' या ऑडिओ सीडीद्वारे मराठी भाषादिनी 27 फेब्रुवारीला प्रकाशित होणार आहे. पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात जब्बार पटेल आणि सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन होईल. श्रीराम लागू आणि दीपा लागू या वेळी उपस्थित राहणार आहेत.

रेणुका माडीवाले आणि दीपा श्रीराम यांच्या प्रयत्नांमुळे कुसुमाग्रजांच्या "प्रवासी पक्षी' या संग्रहातील निवडक कवितांचे श्रीराम लागू यांनी केलेले वाचन ध्वनिमुद्रित होऊ शकले. "कवितेच्या पलीकडे' या ऑडिओ सीडीच्या स्वरूपात ते पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित होणार आहे. कविता कशी वाचावी, याचा वस्तुपाठच प्रवासी पक्षीच्या निमित्ताने लागू यांनी घालून दिला आहे. "कणा', "हुकूमशहा', "गाभारा', "अखेरची कमाई', "प्रार्थना', "म्हातारा... म्हणतोय', "संशोधक', "संत', "आश्‍चर्य', "पुतळा', "याचक', "प्रेमयोग', "याच मातीतून', "तो', "भीती', "नक्षत्रांनो", "नट' आदी अनेक कविता यात आहेत.

Web Title: shriram lagu sound to kusumagraj poem