भावगीतांचा तारा...

arun date
arun date

इंजिनिअर गायक
अरुण दाते यांनी सुरवातीला इंदूरजवळच्या धार येथील कुमार गंधर्वांकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला; पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळले. अरुण दाते टेक्‍स्टाईल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत राहत असताना ते पु. ल. देशपांडे यांना भेटत असत. अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून पुलंनीच रामूभैया दाते यांना तसे सांगितले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते अनुत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर रामूभैया दाते यांनी त्यांना गायक होण्यासाठी प्रोत्साहन दिले. घरूनच प्रोत्साहन असल्याने अरुण दाते टेक्‍स्टाईल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले. गायक होण्यासाठी दाते यांनी २८ वर्षे टेक्‍स्टाईल इंजिनिअरची नोकरी सोडून दिली आणि स्वत-ला पूर्णपणे संगीत क्षेत्राला वाहून घेतले. 


इतिहास घडविला
अरुण दाते आकाशवाणीवर १९५५ पासूनच गाऊ लागले होते. १९६२ मध्ये ‘शुक्रतारा मंदवारा’ या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर एकामागोमाग एक असंख्य कामे मिळत गेली.  हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत-दिग्दर्शक त्यांच्या पाठीस लागले होते. ‘मी हिंदी मुलखातला, माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी, हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही’ असे म्हणणाऱ्या अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले आणि इतिहास घडला. वयाच्या पन्नाशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. २०१० पर्यंत अरुण दाते यांचे ‘शुक्रतारा’ या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे २५०० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल होते. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक ‘अल्बम’ आजही लोकप्रिय आहेत. 

वडिलांविषयी कृतज्ञता
मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली, असे म्हटले जाते. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या ‘शुक्रतारा’ या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त स्वत: गायलेली गीतेच सादर करत असत आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतही असत. अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. अरुण दाते यांनी या जुन्या पुस्तकात वडिलांचे (रामूभैयांचे) जवळजवळ संपूर्ण जीवन सांगितले असून, अशा वडिलांच्या सहचर्यामुळे त्यांचे जीवन फुलण्यासाठी कशी मदत झाली ते वर्णिले आहे. हे पुस्तक १९८६ मध्ये प्रसिद्ध झाले होते. २०१६ मध्ये हे पुस्तक ‘शुक्रतारा’ या नावाने पुन-प्रकाशित करण्यात आले होते. अरुण दाते हे पहिल्या गजाननराव वाटवे पुरस्काराचे मानकरी ठरले होते. 

आणि मी अरविंदचा अरुण झालो..! 
आकाशवाणीतल्या निवेदिका कमलिनी विजयकर यांच्या हातात रेकॉर्डिंग केलेले एक भावगीत आले. ते पाहताच एक गफलत त्यांच्या लक्षात आली. हिंदी गाणी गाताना अरुण दाते ए. आर. दाते या नावाने गात असत. त्याच नावाने त्यांनी शुक्रतारा मंद वारा हे गाणे आकाशवाणीसाठी रेकॉर्डिंग केले होते; पण भावसरगमसारख्या मराठी कार्यक्रमांसाठी इंग्लिश इनिशिअल्स्‌ चालत नसत. कमलिनीबाईंनी धावपळ करीत, भावसरगमचे निर्माते यशवंत देव यांची भेट घेतली. त्या त्यांना म्हणाल्या,‘‘दाते यांची ए. आर. ही अद्याक्षरे चालणार नाहीत. तुम्ही त्यांचे नाव सांगा, नाहीतर मला नाईलाजाने गेल्या महिन्याचंच गाणं वाजवावं लागेल.’’ यशवंत देव बुचकळ्यात बडले. साऱ्या मेहनतीवर, जुळून आलेल्या योगावर केवळ नावामुळे पाणी पडणार होते. दाते यांना त्यांचे वडील ‘अरू’ अशी हाक मारताना देव यांनी ऐकले होते. त्यांचे खरे नाव देव यांनासुद्धा माहिती नव्हते. ते कमलिनीबाईंना म्हणाले, ‘‘तुम्ही अरुण दाते असं नाव उच्चारा.’’ गंमत अशी, की अरुण दाते यांचे खरे नाव होते अरविंद दाते. आपले पहिले वहिले मराठी गाणे कसे झाले आहे, याची उत्कंठा दाते यांनाही होती. ठरलेल्या दिवशी ते रेडिओ लावून कार्यक्रमाची प्रतीक्षा करू लागले आणि रेडिओवरून कमलिनीबाई बोलल्या, ‘‘ते गाणे ऐका अरुण दाते यांच्या आवाजात.’’ हा अरुण दाते कोण, असा प्रश्‍न अरविंद दाते यांना पडला. नावाबद्दल घडलेले रामायण त्यांना नंतर कळले. तोपर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील रसिक श्रोते अरुण दाते यांच्या नावाने मंत्रमुग्ध झाले होते. अरविंद या शब्दाची कात टाकून ते अरुण दाते म्हणून परिचित झाले. देव यांनीच दिलेले नाव रसिकांच्या मनावर कायमचे कोरले गेले. 

दर्दभरा आवाज कानात राहावा
अरुण दाते यांच्या शतदा प्रेम करावे या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे मे १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. ठाकरे म्हणाले, ‘‘माणसाचे आयुष्य खुले असावे, त्यात इतरांना देण्यासारखे खूप काही असावे. अशी दानशूरता दाते यांच्याकडे आहे. थोड्या वेगळेपणाने त्यांना ‘सूरदाते’ असेही म्हणता येईल. वादळी वारा सुटावा, त्यामागे पाऊस बरसावा, मग मातीचा मत्त गंध भरून जावा. अशावेळी दाते यांच्या गाण्याची आठवण आवर्जून होते. त्यांचे गाणे ऐकताना हलकिशी शिरशिरी, हुडहुडी किंवा गारवा जाणवतो. दाते यांच्या गाण्याचा शिडकावाच रसिकांच्या जीवनात आनंद फुलवितो. दाते यांचा असा दवभरला- दर्दभरा आवाज अखंड कानात राहावा असे वाटते.’’ 

‘‘वर्षे उलटत जातात. साठी पूर्ण होत आहे. आठवण येते ती आईची. जिने मला प्रथम शिक्षण पूर्ण करायला लावले. त्यानंतर रियाजासाठी आग्रह धरला. तू गायक म्हणून ओळखला गेला पाहिजेस, असे तिचे म्हणणे होते. माझ्या वडिलांसारखा रसिकराज तर विराळाच. मी पहिली गझल गाताच व त्याला जाणकारांची दाद मिळतातच त्यांनी पेढे वाटले. लहानपणापासून माझ्या घरी मोठमोठ्या कलावंतांच्या मैफली झाल्या. बालपणापासून मी संगीत ऐकत आलो. त्यामुळे कान तयार झाला.’’ 
(दाते यांच्या एकसष्टीनिमित्त ‘सकाळ’मध्ये (चार मे १९९४) 
प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीतील एक आठवण.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com