सोशल मीडियावरील चित्रामुळे ट्रॉम्बेमध्ये तणाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मानखुर्द - सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे चित्र टाकल्यामुळे संतप्त जमावाने काल रात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यावेळी दंगेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांचा मारा केला. याप्रकरणी "एमआयएम'चे नगरसेवक शाहनवाज हुसेन यांनाही अटक झाली आहे. 

मानखुर्द - सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे चित्र टाकल्यामुळे संतप्त जमावाने काल रात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यावेळी दंगेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांचा मारा केला. याप्रकरणी "एमआयएम'चे नगरसेवक शाहनवाज हुसेन यांनाही अटक झाली आहे. 

चिता कॅम्प परिसरातील एका 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर शनिवारी (ता. 18) रात्री दहाच्या सुमारास धार्मिक भावना दुखावणारे चित्र पोस्ट केले होते. त्यावर काही नागरिकांनी आक्षेप घेत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सायबर कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. त्यानंतरही सुमारे 150 हून अधिक जणांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यावर दगडफेक करत हल्ला चढवला. तसेच पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केले. जमावाने पोलिसांचे एक वाहन जाळले. या हल्ल्यात 15 पोलिस व 20 नागरिक जखमी झाले. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांचा मारा केला. त्यात दोन तरुण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द व गोवंडीहून पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाचे पथक दाखल झाले. 

या प्रकरणी पोलिसांनी "सीसी टीव्ही फुटेज'च्या आधारे हल्लेखोरांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर "एमआयएम'चे नवनिर्वाचित नगरसेवक शाहनवाज हुसेन व त्यांच्या खासगी सचिवासह 17 जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात दंगल माजवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली. या संदर्भात नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हल्लेखोरांना 24 मार्चपर्यंत व वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्याला 23 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तणावपूर्ण रविवार... 
ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या परिसरात रविवारी तणावपूर्ण शांतता होती. पोलिस ठाण्याच्या तावदानांच्या काचा व वाहनांच्या काचांचे तुकडे दिसत होते. हल्ल्यात वापरण्यात आलेले दगड, दारूच्या बाटल्या आणि चपला अस्ताव्यस्त पडल्या होत्या. जाळलेले पोलिस वाहन तेथून हटवले होते. मात्र, जाळपोळीच्या खुणा दिसत होत्या. बंदोबस्तासाठी तैनात पोलिस अधिकारी बंद दुकानांसमोर, झाडाखाली आणि उभ्या रिक्षांमध्ये बसून ऊन आणि वाढत्या तापमानापासून स्वतःचा बचाव करत होते. 

खासदार राहुल शेवाळेंनी घेतला परिस्थितीचा आढावा 
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज सकाळी ट्रॉम्बे पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी उपायुक्त शहाजी उमप यांच्याकडून माहिती घेतली.