मी मुस्लिमविरोधी नव्हे, धर्मनिरपेक्ष आहे- सोनू निगम

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

धार्मिक नव्हे, सामाजिक संदर्भ
आपण एकमेकांशी समजुतदारपणे वागणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्याने यावेळी केले. आपण या मुद्द्यावर सामाजिक पार्श्वभूमीवर बोलत आहोत, धार्मिक पार्श्वभूमीवर नव्हे, असेही त्याने स्पष्ट केले. 

मुंबई : 'इतकी साधी गोष्ट एवढा मोठा चर्चेचा विषय बनेल असे आपल्याला वाटलं नव्हतं. मी मोहंमद रफी यांना माझा गुरू मानलं आहे. माझा चालक मुस्लिम आहे. मी मुस्लिमविरोधी नाही. मी स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतो,' असे प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याने सांगितले. 

रोज पहाटे अजानच्या आवाजामुळे जाग येत असल्याचे सांगून सोनू निगम याने ट्विटरद्वारे त्यावर नाराजी व्यक्त व्यक्त केली होती. त्या जाहीर विधानांमुळे नाराज झालेल्या पश्‍चिम बंगालमधील एका मुस्लिम नेत्याने सोनू निगमचे टक्कल करून त्याची धिंड काढणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

त्याला प्रत्युत्तर देत सेलिब्रिटींची केशभूषा करणारे आलिम हकीम यांना बोलावून सोनू निगमने स्वतःहून आपले टक्कलही करून घेतले. 'अजान'संबंधीच्या विधानांवरून गदारोळ झाल्यानंतर सोनू निगमने माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. 

माझे केस कापून घेतले म्हणजे हे मी कोणाला आव्हान देत नाही. हे त्याच्याविरुद्धचे आंदोलन नाही. माझे केस कापणाराही मुस्लिम आहे हे मला दाखवायचे होते. सर्व बाबींचा योग्य तो अर्थ लावण्याचा हा मुद्दा आहे. 
आपण एकमेकांशी समजुतदारपणे वागणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्याने यावेळी केले. आपण या मुद्द्यावर सामाजिक पार्श्वभूमीवर बोलत आहोत, धार्मिक पार्श्वभूमीवर नव्हे, असेही त्याने स्पष्ट केले.