नियोजनाअभावीच एसटी तोट्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

'कॅग'चे ताशेरे; बेकायदा वाहतूक रोखण्यात अपयश

'कॅग'चे ताशेरे; बेकायदा वाहतूक रोखण्यात अपयश
मुंबई - प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी धोरण ठरवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महामंडळाची कार्यक्षमता सुधारण्याचे नियोजन कोलमडल्याने एसटी महामंडळाचा तोटा वाढला, असे ताशेरे महालेखापरीक्षकांनी (कॅग) ओढले आहेत. बेकायदा वाहतूक रोखण्यात अपयश, रस्त्यांची दुरवस्था, इंधनाचे वाढते दर, कालबाह्य बस आदी कारणांमुळे एसटीला फटका बसला आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

एसटीची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार बस आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत महामंडळासोबत नियोजन करते; पण चार वर्षांत एकदाही हे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. खासगी व बेकायदा वाहतुकीला आळा घालण्यात आणि प्रदूषण कमी करण्यात एसटी महामंडळ अपयशी ठरल्याचा ठपका "कॅग'ने ठेवला आहे. सुमारे 18 हजार बस, एक लाख दहा हजार कर्मचारी, 252 आगारे आणि दररोज सरासरी 65 लाख प्रवासी असा एसटी महामंडळाचा कारभार आहे.

राज्यातील 252 आगारांपैकी केवळ वीस आगारे जेमतेम नफ्यात आहेत. प्रवासी संख्या वाढवण्यासह उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असतानाच 2012 ते 2016 या चार वर्षांत 16 कोटी 27 लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. या कालावधीत एसटीचा तोटा 35 कोटी आठ लाखांवरून 1934 कोटी आठ लाखांवर पोचला आहे. एसटीच्या ताफ्यात चार वर्षांत 3500 नव्या बस दाखल झाल्याने बसची संख्या 18 हजार 11 झाली. वर्षाला 1700 बस मोडीत काढल्या जातात; मात्र तेवढ्याच नव्याने दाखल होत नसल्याने एसटी तोट्यात गेल्याचे "कॅग'च्या अहवालात म्हटले आहे.

सध्या 18 हजार बससाठी दररोज 12 लाख लिटर डिझेल लागते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात डिझेल महाग आहे. त्याचा फटका एसटीला बसत आहे.

चालक, वाहकांच्या अपुऱ्या संख्येमुळे नियोजन कोलमडल्याचे कारण एसटी महामंडळाने दिले. तसेच तांत्रिक कारणे, दुरुस्ती, नादुरुस्त बसचे प्रमाण आदी कारणे मंडळाने दिली असली, तरी मंडळाच्या कारभाराबाबत "कॅग'ने नाराजी व्यक्त केली आहे.

बेकायदा वाहतुकीमुळे वर्षाला 600 कोटींचा तोटा
बेकायदा प्रवासी वाहतुकीमुळे वर्षाला किमान 600 कोटींचे नुकसान होते. ही वाहतूक बंद करण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवासी भारमान 54 टक्के खालावले आहे. एसटीच्या इतिहासातील हा निचांक आहे. 2010 ते मार्च 2016 या कालावधीत एसटी अपघातात तीन हजार 64 जणांचा मृत्यू झाला. यात पाच वर्षांत 90 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

एसटीचा कारभार...
18 हजार बस
1 लाख 10 हजार कर्मचारी
252 आगारे
65 लाख दररोजचे सरासरी प्रवासी

Web Title: ST loss by management