राज्यातील 192 गावांत सौभाग्य योजनेतून वीज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

राज्यभरातील 192 गावांमध्ये "सौभाग्य' योजनेतून वीज जोडणीची सुरुवात झाली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या आदेशानुसार या योजनेअंतर्गत 100 टक्के विद्युतीकरण होणार आहे. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने सौभाग्य योजनेअंतर्गत गरीब आणि आदिवासी वस्त्यांमध्ये विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे.

मुंबई : राज्यभरातील 192 गावांमध्ये "सौभाग्य' योजनेतून वीज जोडणीची सुरुवात झाली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या आदेशानुसार या योजनेअंतर्गत 100 टक्के विद्युतीकरण होणार आहे. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने सौभाग्य योजनेअंतर्गत गरीब आणि आदिवासी वस्त्यांमध्ये विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या योजनेची सुरुवात झाल्याची माहिती महावितरणने दिली. 

30 एप्रिलपर्यंत ग्रामस्वराज्य अभियान राबवले जाणार आहे. दलित वस्त्यांत विद्युतीकरण हा त्याचाच एक भाग आहे. यासाठी सर्व अधीक्षक अभियंत्यांना क्षेत्रिय स्तरावर विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. या कामाची जबाबदारी अधीक्षक अभियंत्यावर असेल. त्यासाठी प्रादेशिक संचालकांनी या कामाचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्थानिक पातळीवर जनमित्र, तंत्रज्ञ यांच्या मदतीने वीजजोडणी नसलेल्यांची आकडेवारी घेऊन आणि तपासून तत्काळ वीजजोडणी देण्याचे स्पष्ट केले आहे. 

ज्या खेडी, पाडे, वाडी व वस्तीतील ग्राहकांना महावितरणच्या पायाभूत सुविधेतून वीजजोडणी देता येत नाही, अशा ग्राहकांची यादी तयार करून त्यांना अपारंपरिक पद्धतीने सौरऊर्जेची वीजजोडणी द्यावी, त्याप्रमाणे कृती कार्यक्रम तयार करून राज्यातील 192 गावांत तातडीने वीजजोडणी देण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचेही यावेळी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहचवण्याचे धोरण असून ग्रामीण व शहरी भागातील वीज नसलेल्या प्रत्येक घरात वीजजोडणी दिली जाणार आहे. 

एलईडी बल्बचा पुरवठा 
राज्यातील 192 गावांमधील दलित वस्त्यांमध्ये 50 रुपयांमध्ये ईईएसएल कंपनी एलईडी बल्बचा पुरवठा करणार आहे. 

Web Title: State 192 Villages provided Electricity under Government Sceme