आरोग्य निधी खर्च करण्यात राज्य सरकार उदासीन - जे. पी. नड्डा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

बेलापूर - केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित अनेक योजना आहेत. त्यांचा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे; पण केंद्राकडून देण्यात येणारा आरोग्य निधी खर्च करण्यात बहुसंख्य राज्य सरकारे उदासीन आहेत, असे सांगून केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या मेडिव्हिजन 2017 कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, डॉ. आर. डी. लेले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विजय पाटील यांनी मेडिव्हिजन 2017 परिषदेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य निदान सेवा व उपचार पद्धतीमध्ये फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. या परिषदेत देशभरातून सुमारे 1200 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मधुमेह, स्तनाचा कर्करोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवरील उपचार पद्धतीचे मोफत प्रशिक्षण देण्याचे काम 100 जिल्ह्यांत सुरू आहे. लवकरच 600 पेक्षा अधिक जिल्ह्यांत हे प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सांगितले.