अल्पसंख्यांक कर्मचारी संघटनेतर्फे रत्नाकर गायकवाड यांना मारहाणीचा निषेध 

संजीव भागवत
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लोकशाहीमध्ये कोणत्याही बाबीसाठी आपली भूमिका मांडण्याची मुभा प्रत्येकाला आहे. एखाद्या गोष्टीबद्दल अन्याय झाला आहे, असे वाटत असेल तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येते.

मुंबई : राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला औरंगाबादमध्ये झालेल्या मारहाणीचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. विविध स्तरांतून या घटनेचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी असोसिएशननेही यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून या मारहाणीचा निषेध केला. 

औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात काल (सोमवार) भारिप बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली. 'लोकशाहीमध्ये कोणत्याही बाबीसाठी आपली भूमिका मांडण्याची मुभा प्रत्येकाला आहे. एखाद्या गोष्टीबद्दल अन्याय झाला आहे, असे वाटत असेल तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येते. असे असतानाही एका कार्यक्षम आणि घटनात्मक पद धारण करणाऱ्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला अनुसरून मानवी मूल्यांचे अनुकरण करणाऱ्या रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करून मारहाण करणे, हे लोकशाहीवर विश्‍वास नसलेल्या लोकांचे कृत्य आहे,' अशी प्रतिक्रिया असोसिएशनचे अध्यक्ष हाजी सैपन जतकर यांनी व्यक्त केली. 

'गायकवाड यांनी केलेले प्रशासकीय कामकाज आणि माहिती आयुक्त म्हणून केलेले काम, त्यासाठी घेतलेले अनेक लोकोपयोगी निर्णय महत्त्वाचे असून अशा व्यक्तीला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,' अशी मागणीही असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. डेव्हिड थॉमस अल्वारिस, सरचिटणीस सलीम बागवान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

 

Web Title: State Government employees condemn attack on Ratnakar Gaikwad