राज्य सरकारच्या 100 शाळा होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

केंब्रिजच्या दोन तज्ज्ञांकडून आराखडा; पाच जिल्ह्यांना भेट

केंब्रिजच्या दोन तज्ज्ञांकडून आराखडा; पाच जिल्ह्यांना भेट
मुंबई - राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या 100 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून केंब्रिजच्या दोन तज्ज्ञांकडून आराखडा केला जाणार आहे. या तज्ज्ञांनी नुकतीच राज्यातील काही जिल्ह्यांना भेट दिली असून, हा आराखडा ते दोन आठवड्यानंतर देणार आहेत.

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. 20) याबाबत बैठक झाली. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, यूकेतून महाराष्ट्रातील शाळांच्या भेटीला आलेले डेन ब्रे, अबिगली बर्नेट व शिक्षण विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सातारा व नागपूर या जिल्ह्यांना भेट दिली. या शाळांमध्ये अपेक्षित असलेला बदल याबाबतचा तपशीलवार अहवाल दोन आठवड्यांनी दिला जाईल. या बैठकीत भेटीदरम्यानचे अनुभव मांडताना दोघांनीही शिक्षण व्यवस्था फक्त माहितीवर आधारलेली असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. साताऱ्यातील ग्रामीण भागातील एका शाळेला भेट दिली, तेव्हा प्रश्‍नाची उत्तरे संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांनी एकत्र दिली; परंतु प्रश्‍नोत्तरांच्या पद्धतीत सर्व विद्यार्थ्यांना उत्तर देणे जमले नसल्याचे डेन यांनी सांगितले. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले, तर अबिगली यांच्या मते भारतीय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांसह मुलांना शिकवण्याची जबाबदारी पालकही वाटून घेत आहेत, असे दिसत असल्याचे सांगितले. यूकेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी फक्त शिक्षकांनाच जबाबदार ठरवले जाते, असे त्यांनी सांगितले.

आहे तेच शिक्षक
सध्या शाळेत शिकवत असणारे शिक्षकच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत शिकवतील; मात्र शिक्षक निवडीसाठी आवश्‍यक निकष केंब्रिज तज्ज्ञाच्या अहवालात मिळतील. सतत नवीन शिकण्यासाठी इच्छुक असणारे, अधिक वेळ काम करण्यासाठी तयार असणाऱ्या व सुटीच्या दिवसांतही कामे करण्याची तयारी असणाऱ्या शिक्षकांना निवडले जाईल, असे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सांगितले.

Web Title: state government school international quality