चला ऑफलाईन होऊ या 

stay offline
stay offline

राहूया कनेक्‍टेड...wi-fi शिवाय! 

अलिकडे आपण कनेक्‍टेड असतो; पण आपल्या जवळच्याशी नव्हे तर कोणा लांबच्याशी... नेटद्वारे. दोन मित्र जरी भेटले तरी त्यांचा निम्मा वेळ व्हॉट्‌सअप चेक करण्यात जातो. 
एकमेकांशी भेटून बोलणं विसरत चाललोय का आपण? काय बाबा, कशाला केलात फोन? ग्रुपवर टाकायचा ना मेसेज? साधं"हाय हॅलो' बोलायच्या आधी नीरजचा असा डायलॉग 
ऐकल्यावर त्याच्या बाबांना काय बोलावं ते कळेना. त्यांनी फोनच ठेवला. बाजूला नेहा उभी होती. ती म्हणाली,""काय रे दादा, चिडतोयस का बाबांवर? त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल ना...'',""अगं, पण तू बघतेयस ना, मी माझ्या बॉसबरोबर स्काईपवर बोलतोय... आणि दहा मिनिटांचा जरा ब्रेक काय घेतला...वाजला लगेच फोन... 
हे देसाई कुटुंब. त्यांनी नव्या घरात शिफ्ट झाल्या झाल्या आधी घरात वाय-फाय कनेक्‍शन घेतलं. सगळं घर नीट लावायच्या आधी हे कुटुंब ऑनलाईन आलं. त्यांची ग्रुपवर चर्चा झाली. घराचं नवं डेकोरेशन, फर्निचर, घरात कुठली गॅजेट्‌स असावीत? अशी बरीच चर्चा त्यांच्या ग्रुपवर झाली. 
आजी-आजोबांना फिरायला गोव्याला पाठवलेलं होतं. त्यांनी ग्रुप चॅटिंगमध्येच त्यांना घरात काय काय हवं ते सांगितलं आणि ऑफलाईन झाले. बाबांना काहीतरी बोलायचं होतं म्हणून फोन केला, तर त्यांना हे उत्तर मिळालं. ऑनलाईन असणाऱ्यांचे असे संवाद आपल्याला नवे नाहीत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, रेल्वे स्टेशन आणि काही मोक्‍याची ठिकाणं अशा सगळीकडे वाय-फाय कनेक्‍शन सुरू होतातय. त्यामुळे हे संवाद नित्याचे होणार हे नक्की. हे जग टुगेदर नसलं तरी कनेक्‍टेड असणार हे ही नक्कीच. पण हे कनेक्‍शन आपुलकीचं 
असेल का? ते मात्र प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असेल. हल्ली घरात जेवण करण्यासाठी बाई ठेवायची झाली तर तिला विचारलं जातं, तुला यु-ट्युबवर जाऊन व्हिडीओ बघून रेसिपी करता येतात का? तर असं हे सगळं! मधली पिढी, युवा पिढी आपल्या ऑफिस, करिअरच्या फेऱ्यात अडकलेली, आजी-आजोबा एखाद्या सोशल ग्रुपमध्ये हिरिरीने भाग घेणारे, 
नातवंडांना संस्कारांचा डेली डोस व्हॉट्‌सऍपवर देणारे... अशी ही कौटुंबिक जीवनशैली झालीय. यात कधी अती झालं की सगळं उलटपुलट होतं. कधी सोशल मीडियावर घरच्या 
कुरबुरी निघतात आणि त्यातून प्रकरण हातघाईवर; तर कधी एखाद्याच्या जीवावर उठणारे प्रसंग घडतात. हा सोशल मीडिया जसा सगळ्या नातेसंबंधात डोकावतोय, तसे त्याआधी 
त्याच्या बरोबर सध्या दुसऱ्या बाजूने इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌सने आपलं घर भरतंय. जाहिरातीत आपल्या घरच्यांसाठी प्रेमाने"मागवा या या गोष्टी' असं सांगतात, तसं आपण टीव्ही , फ्रीज, 
कुकर, मिक्‍सर, लॅपटॉप, मोबाईल असं एकेक सगळं मागवत जातो आणि शेवटी त्या गॅजेट्‌सच्याच आहारी जातो. म्हणून तर हल्ली आजीने नातवाला सांगितलं, बाळ विंडो उघड; तर नातू म्हणतो, उघडतो; पण आधी पासवर्ड सांग. मध्यंतरी एका जाहिरातीत असं दाखवलं होतं की बाळ जन्मल्यावर रडण्याऐवजी वाय-फायचा पासवर्ड विचारतं... पण खरंच अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर आपण हातातलं गॅजेट सोडून इतरांशी चार शब्द बोललो नाही तर!"आवड असेल तर सवड नक्कीच मिळते'यानुसार आपण आवडीने एकेक काम केलं ना, तर त्या कामाचं ओझं वाटत नाही. आपल्या आवडीचं रूपांतर व्यवसायात झालं तर.. या संकल्पनेला जन्म देऊन भारतीयांनी स्टार्टअपच्या विश्‍वात प्रवेश केला. पण पुन्हा ते 
आपल्या कुटुंबापासून तुटलेच. हेच जे तुटलेपण आहे, तेच आपल्याला सांधायचं आहे. आपल्या परदेशी मित्रांना किंवा ऑफि समधल्या कलिग्सना इम्प्रेस करण्यासाठी"घर का खाना'ची तारीफ करू नका; तर खरंच एखादी डिश बनवून त्यांना खायला घाला; किंवा त्यांना घरी बोलवा. हवं तर त्याला कॉर्पोरेट गेट टुगेदर समजा. 
अलीकडेच काही घटना अशा घडल्या की, वृद्धाश्रम आणि पाळणाघराविषयी बरंच काही बोललं जात होतं. तेव्हा बऱ्याच जणांचं असं मत होतं, की एकत्र कुटुंबपद्धती असेल तर 
अशा समस्या निर्माणच होणार नाहीत. पण मुद्दा हा आहे, की सुरुवात कोणी आणि कुठून करायची. पुन्हा ही गोष्ट फिरून हल्लीच्या आधुनिक मुलींवर येते. त्यांना सासू-सासरे नको असतात. अशा वेळी दोन्हीकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. बराचसा वेळ आपला ऑफिसमध्ये जातो. फ्लॅट संस्कृतीमळे शेजाऱ्यांशी चार हात लांबच राहणं आपण पसंत करतो. 
कारण आपण"टीटीएमएम'वाली पिढी आहोत. तुझं तू, माझं मी हीच भाषा सध्या आपल्याला कळते. मग आपण, आपलं आणि आम्ही हे सगळे शब्द परके होऊन जातात. 
असं सगळं सध्या चाललंय, खूप काही घडतंय. तरीही संवाद होत नाहीय. ऑनलाईन इतकी मित्रमंडळी जमवलीयत ; पण कुणासोबत बसून कित्येक दिवस घटकाभर बोलल्याचं आठवत नाही. यावर उपाय काय, असं विचारलंत तर एक छोटासा उपाय सांगते. एके दिवशी कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र या आणि मिक्‍सर, कुकर, ओव्हन अशी कुठलीच स्वयंपाकघरातील आधुनिक साधनं न वापरता सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करा. आजी- आजोबांना त्यांच्या तरुणपणीची एखादी पाककृती विचारा आणि बनवा. त्या दिवशी सगळे ऑफलाईन राहा. मोबाईलमधील डेटा कनेक्‍शनही बंद ठेवा. किंवा एखादा दिवस घरातला वीजपुरवठा (लाईट कनेक्‍शन) बंदच ठेवा. बघा, काय काय अडतं ते. शक्‍यतो अडलं तरी त्याने तुम्हाला काही फरक पडलेला नाहीय, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मनसोक्त बोला. बोलताना विषय सगळे घरगुतीच ठेवा. पुन्हा गप्पांमध्ये ऑफिस आणू नका. मग बघा काय धमाल येते ती. आपल्या भावंडांसोबत सगळे विषय शेअर करा. अगदी मला माझ्या कॉलेजमधला तो मुलगा मला आवडायचा किंवा"डियर जिंदगी'मध्ये आलिया भट्ट काय दिसते ना. पण नाही; विराट कोहलीच भारी दिसतो, अशा सगळ्या विषयांवर तुम्हाला बोलता येईल आणि बोलला नसाल तर आपण आपल्या भावंडांशी या विषयावरही बोलू शकतो, याचं लयभारी वाटेल. ही इलेक्‍ट्रॉनिक (आधुनि क) उपकरणं आपल्या मदतीसाठी आहेत. त्यांची योग्य वेळी मदत घेऊन त्यांना बाजूला करायचं. नाहीतर ती आपली जागा कधी घेतील हे आपल्याला कळणारसुध्दा नाही..."जिंदगी' चॅनेलवर "भागे रे मन' नावाची एक मालिका लागायची. त्यात एक संवाद होता. "फॅमिली में चाहे कितने भी प्रॉब्लेम्स क्‍यू न हो, फोटो खिंचते वक्त चेहरेपे स्माईल होनी चाहिए।' पण असे एकत्र मिळून फॅमिली सेल्फी पोस्ट करण्यापेक्षा एकत्र येण्यातली गंमत स्वत: अनुभवा. हल्ली करण्यापेक्षा आपण दाखवण्याला महत्त्व देत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. आठवा आपल्या आई-बाबांना, मित्रांना, आजी-आजोबांना भेटून शेवटच्या गप्पा कधी मारल्यात ? मी तर म्हणते, तेही जाऊ द्या. तुमचे तुम्हीच स्वत:ला कधी भेटलात? हा प्रश्‍न विचारा. काय म्हणताय, थांबा जरा? लेटेस्ट सेल्फी कुठला अपलोड केलाय तो बघतो...? थोडक्‍यात मला सांगयचंय ते हेच, की चला ऑफलाईन होऊ या. घर गॅजेट्‌सनी नाही तर आपल्या माणसांनी भरूया. नुसतेच कनेक्‍टे ड नको टुगेदर होऊया आणि तुम्हाला हल्लीचा नियम तर माहितच आहे. दोन ब्लूस्टीक दिसल्या म्हणजे याचा अर्थ मॅसेज वाचला असं होत नाही. तसंच जोडलेले असूनही एकमेकांना भेटून खूप मनापासून काही बोलल्याशिवाय आपण एकत्र असू शकत नाही. नव्या वस्तू कधीही विकत घेता येतील; पण नाती ही जपावीच लागतात. नुकत्याच लावलेल्या छोट्याशा रोपट्याची आपण काळजी घेतो, तशी नात्यांचीही काळजी घ्यावी लागते. मगच ती फुलतात. म्हणूनच म्हणते, स्टे टुगेदर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com