परिवहन विभागाची खासगी बस कंपन्यांविरोधात धडक कारवाई 

परिवहन विभागाची खासगी बस कंपन्यांविरोधात धडक कारवाई 

मुंबई - सुटीत खासगी बस कंपन्यांकडून जादा भाडे आकारून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची लूट होत असल्याबाबत "मुंबई टुडे'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर परिवहन आयुक्त कार्यालयाने त्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. परिवहन विभागाने आता स्वतःहून कारवाई सुरू केली आहे. ऑनलाईन बुकिंग साईटवरील बसचे भाडे तपासून त्यावरही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी "सकाळ'ला दिली. 

राज्यात शेकडो खासगी गाड्या धावत असतात. त्यांपैकी बहुतेक गाड्या सुटीच्या वेळी प्रवाशांकडून जादा भाडे आकारतात, असा अनुभव सर्वच प्रवाशांना येतो. अशा स्थितीत परिवहन विभागाने वेगात कारवाई करावी. केवळ प्रवाशांच्या तक्रारींवर अवलंबून न राहता स्वतःही अचानक जाऊन बसच्या भाड्यांची तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यानुसार अशी कारवाई होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

"मुंबई टुडे'मध्ये लक्‍झरी बसचालकांकडून होत असलेल्या मनमानी भाडेआकारणीबद्दल सोमवारी (ता. 7) बातमी प्रसिद्ध झाली होती. रत्नागिरीला जाणाऱ्या गाड्या कसे मनमानी भाडे आकारतात त्याची उदाहरणे त्यात देण्यात आली होती. त्यानंतर लगेच परिवहन विभागाने त्या दिवशी केलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला. सोमवार संध्याकाळपर्यंत पुण्यातील आठ आणि मुंबईतील पाच खासगी बसगाड्यांना नोटिसा दिल्याचे त्यात म्हटले होते; मात्र कारवाईचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे प्रवासी सांगत आहेत. जादा भाडेवाढीविरुद्ध अधिकाधिक प्रवाशांनी तक्रारी कराव्यात म्हणून त्यांना विभागाच्या तक्रार हेल्पलाईनवर आपले नाव-दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आदी तपशील देण्याची सक्ती करू नये, अशीही मागणी आहे. अन्यथा काही राजकीय लागेबांधे असलेले बस ऑपरेटर प्रवाशांवर दडपण आणू शकतात, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. 

ऑनलाईन बुकिंग साईटची तपासणी सुरू 
इंटरनेटवरून आरक्षण करणाऱ्या कंपन्यांवरही परिवहन विभागाने कारवाई करावी, अशीही मागणी होती. त्यापैकी काही इंटरनेट कंपन्यांचे भाडे वर्षभरात सारखेच असले तरीही ते सरकारने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा (एसटी भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट) जास्त नसावे, अशी अट पाळली जात नाही. आता अशा इंटरनेट साईटवरही विभागाचे लक्ष असून त्या तपासून त्यावरही कारवाई केली जात आहे, असेही शेखर चन्ने म्हणाले. 

जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बस कंपन्यांवर रोजच कारवाई केली जात आहे; मात्र नोटीस दिल्यावर पुढील कठोर कारवाई करण्यापूर्वी दोनही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना पुरावे मांडण्याची संधी देणे, ते तपासणे आदी प्रक्रियेत वेळ जातो. अर्थात ती प्रक्रिया पूर्ण करणेही अत्यावश्‍यक आहे व त्याला थोडा वेळ लागतो; मात्र नियमभंग करणाऱ्या सर्वच खासगी बसगाड्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 
शेखर चन्ने, परिवहन आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com