व्यसनाला कंटाळून तरुणाची 19 व्या मजल्यावरून उडी

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

अर्जुन हा मूळचा बंगळुरूचा आहे. तो शिक्षणाकरता मुंबईत आला होता. तो अंधेरी परिसरात राहत होता. त्याला अमली पदार्थाचे व्यसन जडले होते. आठ दिवसांपासून तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता.

मुंबई - नैराश्‍य आणि अमली पदार्थाच्या व्यसनाला कंटाळलेल्या तरुणाने वांद्रे येथील "हॉटेल ताज लॅण्ड एंड'च्या 19 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. अर्जुन भारद्वाज (वय 23) असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे.

अर्जुन हा मूळचा बंगळुरूचा आहे. तो शिक्षणाकरता मुंबईत आला होता. तो अंधेरी परिसरात राहत होता. त्याला अमली पदार्थाचे व्यसन जडले होते. आठ दिवसांपासून तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता. सोमवारी दुपारी तो वांद्रे येथील "हॉटेल ताज लॅण्ड एंड'मध्ये आला.

सायंकाळी त्याने 19 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत तो पडून होता. हॉटेलमधील सुरक्षा रक्षकाने याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली. पोलिसांनी तो राहत असलेल्या खोलीची तपासणी केली. तिथे पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढून तो फेसबुकवर अपलोड केला होता. आत्महत्येची माहिती त्याच्या वडिलांना कळवण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच त्याचे वडील मुंबईत आले आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवल्याचे वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले.