सुभाष देशमुखांना 'क्‍लीन चिट'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मुंबई - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाच्या गाडीत 91 लाख 50 हजार रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केली होती; मात्र या संशयास्पद रकमेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना "क्‍लिन चिट' दिली असून, राष्ट्रवादी याविरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

पकडण्यात आलेल्या रकमेविषयी खुलासा करताना हे ऊसतोड कामगारांचे पैसे असल्याचे देशमुख यांनी अगोदर सांगितले. त्यानंतर बॅंकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे पाठवण्यात येत होते, असे सांगत भूमिका बदलली; मात्र मल्टिस्टेट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशमुख हा पैसा काळ्याचा पांढरा करत होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

या गंभीर बाबीवरून सरकारने त्यांच्यावर "पीएमएलए'च्या अंतर्गत मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करून अटक करायला हवी होती. याउलट त्यांची चौकशी त्यांच्याच खात्याच्या एका उपनिबंधकाच्या माध्यमातून होणे म्हणजे, त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना "क्‍लीन चिट' देण्यात आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिला.

मागील आठ दिवसांत देशमुख यांच्या बॅंकेत आठ कोटींची ठेवी वाढली असल्याचे देशमुख यांनीच सांगितले असून, यावरून त्यांनी काळा पैसा स्वतः च्या खात्यात दाखवला आहे. हा सगळा प्रकार कुठेतरी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.