"मिशन बंडोबा' झाले यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

ठाणे -  ठाण्यातील पालिका निवडणुकीच्या रणांगणात बंड करणाऱ्या बंडोबांना थंड करण्यात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना मंगळवारी यश आले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 228 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. छाननीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. पालिका निवडणुकीत 33 प्रभागांतून 131 नगरसेवकपदाच्या जागांसाठी 805 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आता राहिलेले आहेत. 

ठाणे -  ठाण्यातील पालिका निवडणुकीच्या रणांगणात बंड करणाऱ्या बंडोबांना थंड करण्यात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना मंगळवारी यश आले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 228 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. छाननीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. पालिका निवडणुकीत 33 प्रभागांतून 131 नगरसेवकपदाच्या जागांसाठी 805 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आता राहिलेले आहेत. 

तुटलेली युती आणि आघाडीची झालेली बिघाडी या अवस्थेत 805 पैकी किती जणांना पालिकेच्या सभागृहात जाण्याची संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 21 फेब्रुवारीला ठाणे पालिकेची निवडणूक होणार आहे. 33 प्रभागांतून 131 नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना आपल्या बंडोबांना थंड करण्यात यश आले आहे. मात्र कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले जयनाथ पूर्णेकर यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी भाजपचे संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचादेखील उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा फटका भाजपला बसला आहे. 

शिवसेनेच्या नगरसेविका पूजा वाघ, नम्रता भोसले, अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेनेच्या माजी महापौर स्मिता इंदुलकर यांनीही माघार घेतली आहे. कृष्णकुमार नायर, प्रमिला भांगे, नीलेश लोहरे, रामदास पडवळ, हेमलता पडवळ, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. वागळे इस्टेट येथे शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता घाग यांनी माघार घेतली असली, तरी चंद्रगुप्त घाग हे मात्र अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा पाटील यांनीही माघार घेतली आहे; तर नौपाड्यातून बंडखोरी करणारे शिवसेनेचे चारही शाखाप्रमुख थंड झाले असून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 

भाजपच्या बंडखोरांचीही माघार 
तिकीट नाकारल्याने भाजपच्या 22 पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले होते. त्यापैकी माजी उपमहापौर सुभाष काळे, विद्यमान नगरसेविका सुशीला लोखंडे यांचे पती सुनील; तसेच विशाखा कणकोसे, महेंद्र जैन, नीलेश कोळी आदी सर्वच बंडखोरांनी माघार घेतली आहे. भाजपच्या शशी यादव यांनीसुद्धा माघार घेतली असली, तरी त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे मनोहर साळवी, मिलिंद साळवी यांच्यासह प्रभाग क्रमांक दोनमधील राष्ट्रवादीचे लकी सिंह गिल यांनीदेखील माघार घेतली आहे.

Web Title: successful mission