'टाटा'च्या बालरुग्णांना निवासाची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - निवासाच्या गैरसोईमुळे टाटा कर्करोग रुग्णालयात येणारे 25 टक्के बालरुग्ण उपचार न घेता परत जातात. काहींना इतर रुग्णांप्रमाणे रुग्णालयाबाहेर पदपथावर राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत बालरुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व नौकायानमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 30) या सुविधेचे उद्‌घाटन होणार आहे.

टाटा कर्करोग रुग्णालयात दरवर्षी अडीच हजार मुले उपचारासाठी येतात. उपचारानंतर ही मुले 90 टक्के बरी होतात. मात्र, परगावाहून आलेल्यांना येथे राहण्याची सुविधा नसल्याने ते उपचार अर्धवट सोडून निघून जातात. उपचारा दरम्यान, काहींचा मुक्काम रुग्णालयाबाहेरील पदपथावरच असतो. ही गैरसोय टाळण्यासाठी उपचार घेणाऱ्या मुलांसह त्यांच्या नातेवाइकांना राहण्याकरता कॉटनग्रीन येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत सेंट ज्यूड संस्थेतर्फे व्यवस्था केली जाणार आहे. सध्या येथे 70 रुग्ण राहतात. तिथे आणखी 100 रुग्णांना राहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

Web Title: tata cancer hospital residence management