एसी लोकलची चाचणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुंबईतील पहिल्या वातानुकूलित (एसी) लोकलच्या चाचणीला कुर्ला कारशेडमध्ये गुरुवारपासून सुरुवात झाली. तीन आठवडे विविध टप्प्यांत ही चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष रुळांवरील चाचणी घेण्यात येईल.

मुंबई - मुंबईतील पहिल्या वातानुकूलित (एसी) लोकलच्या चाचणीला कुर्ला कारशेडमध्ये गुरुवारपासून सुरुवात झाली. तीन आठवडे विविध टप्प्यांत ही चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष रुळांवरील चाचणी घेण्यात येईल.

चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्‍टरीतून ही एसी लोकल 5 एप्रिल 2016 रोजी मुंबईत आणण्यात आली. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष चाचणीला कुर्ला कारशेडमध्ये सुरुवात झाली आहे. भारत हेवी इलेक्‍ट्रिकल्स लि. (भेल), रेल्वेची रिसर्च डिझाईन ऍण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन व कारशेडमधील वरिष्ठ इंजिनीयरनी सकाळपासून कारशेडमध्ये चाचणी घेण्यास सुरुवात केली. स्वयंचलित दारे, एलईडी सिग्नल व चालकाच्या केबिनमधील प्रत्येक यंत्रणा बारकाईने तपासण्यात आली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की कारशेडमधील चाचणी 26 नोव्हेंबरपर्यंत चालेल. लोकलच्या 16 भागांची चाचणी करण्यात येईल. प्रत्येक भागाच्या शंभरहून अधिक चाचण्या होतील. दार उघडण्याचा वेळ, गर्दीमुळे प्रवासी दारात अडकला तर काय करायचे, तसेच इतर तांत्रिक घटनांची चाचणी केली जाईल. त्यानंतर प्रत्येक डब्यात प्रवाशांच्या वजनाइतके सामान ठेवून प्रत्यक्ष रुळावर चाचणी होईल. त्याला दोन महिने लागण्याची शक्‍यता आहे. रिसर्च डिझाईन ऍण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने प्रमाणपत्र दिल्याशिवाय लोकल प्रवाशांच्या वाहतुकीसाठी देण्यात येणार नाही.

डब्यात 30 टन क्षमतेचा एसी
एसी लोकलला 12 डबे आहेत. प्रत्येक डब्यात 30 टन क्षमतेचा एसी आहे. या पद्धतीने लोकलमध्ये 360 टन क्षमतेचे एसी प्रवाशांना गारेगार करण्यासाठी सज्ज आहेत.

वांद्रे ते दहिसर?
मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्ल्यापर्यंत जुने ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यामुळे एसी लोकल त्यावरून धावू शकणार नाही. पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते महालक्ष्मी स्थानकापर्यंत पुलाच्या उंचीमुळे हे शक्‍य होणार नाही. पश्‍चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकल जैन यांनी सांगितले, की एसी लोकल अद्याप मध्य रेल्वेच्या ताब्यात आहे. चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. महालक्ष्मी स्थानकानंतर आम्हाला ही लोकल चालवण्यास काहीच हरकत नाही. याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. ही परिस्थिती पाहता वांद्रे ते दहिसरदरम्यान ही लोकल सोडण्याचा प्रयत्न रेल्वे करणार आहे.