ठाकरे, फडणवीसांचे भवितव्य मतपेटीत!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23 फेब्रुवारीला ते कुलूप उघडेल. निकालानंतर राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

मुंबई - महापालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई असली, तरी या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य डावावर लागले आहे. मतदारांनी आज कौल दिला आहे. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य कुलूपबंद झाले आहे. 23 फेब्रुवारीला ते कुलूप उघडेल. निकालानंतर राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

युती तुटल्यास राज्यात शिवसेना भाजपमध्येच थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. महानगरांमध्ये या दोन्ही पक्षांची प्रमुख ताकद असल्याने संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यामुळे आता ही कार्यकर्त्यांची लढाई राहिलेली नसून पक्षश्रेष्ठींचे महाभारत झाले आहे. या महाभारतात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्यांचे राजकारण आज कुलूपबंद झाले. फडणवीस आणि ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नशीबही मतपेटीत बंद झाले.

राजकारण डावावर...
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - संपूर्ण राज्याची जबाबदारी यांच्यावर होती. मुख्यमंत्रीच भाजपचे एकमेव स्टार प्रचारक होते. त्यामुळे पोस्टरवही पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा फडवीसच मोठे होते. युती तुटल्याने एकहाती सत्ता मिळवण्याचे आव्हान त्यांना आहे. ते त्यांनी यशस्वी केल्यास राज्याच्या राजकरणात त्यांना पक्षांतर्गत आणि विरोधकांमध्येही स्पर्धक राहाणार नाही, असे बोलले जात आहे. मात्र यात ते अपयशी ठरले तर त्यांनाही मोठी राजकीय किंमत चुकवावी लागले, असे राजकीय जाणकार सांगतात.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख - महापालिका हा शिवसेनेचा श्‍वास आहे. त्यामुळे मुंबई - ठाण्यासारखी महापालिका हातची गेल्यास त्याची मोठी किंमत उद्धव ठाकरे पर्यायाने शिवसेनेला चुकवावी लागेल. भाजपला थेट भिडू शकतो, अशी ओळख आता उद्धव यांची झाली आहे. ती कायम ठेवण्यासाठी त्यांना मुंबई, ठाणे, नाशिक या महापालिका ताब्यात घ्याव्याच लागतील. यात उद्धव यांचे डावपेच अपयशी झाल्यास त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना आणखी पाच वर्षे थांबावे लागेल. भाजपशी युती करून महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला, तरीही उद्धव यांचे ते अपयशच असेल, असे बोलले जात आहे.

अध्यक्ष राज ठाकरे, मनसे अध्यक्ष - विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना अपयश आले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही त्यांना अनेक नगरसेवक सोडून गेले. त्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मनसेची अस्तित्त्वाची लढाई आहे. या लढाईत पक्षाला संजीवनी मिळणे अवघड असले, तरी किमान राजकीय अस्तित्व टिकण्यासाठी मनसेची ही लढाई आहे.

संजय निरूपम, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष - देशभरात कॉंग्रेसला प्रतिकूल वातावरण असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेऊन संजय निरुपम यांनी वरीष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतली. त्यातच तिकीट वाटपावरूनही पक्षांत प्रचंड नाराजी आहे. आतापर्यंत सत्तेपासून कॉंग्रेस लांबच राहिली असली तरी नेहमी दुसऱ्या क्रमांकांचे नगरसेवक निवडून येत होते. मात्र यावेळी हा क्रमांक घसरल्यास निरुपम यांची खुर्ची कायमची जावू शकते, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: thackeray fadanis future in voting box