थॅलेसेमियाशी लढणाऱ्या लक्ष्मीची कर्मकहाणी

हर्षदा परब
मंगळवार, 9 मे 2017

नवऱ्यानं सोडलंय, कुटुंबीयांनी नाकारलं, तरी ती जिद्दीनं उभी

नवऱ्यानं सोडलंय, कुटुंबीयांनी नाकारलं, तरी ती जिद्दीनं उभी
मुंबई - निरक्षर लक्ष्मी चौधरीनं थॅलेसेमिक मुलांवर उपचाराचा निश्‍चय केला आणि नवऱ्यानं, सासरच्यांनी इतकंच काय सख्ख्या भावानंही तिला वाळीत टाकलं. कधी ना कधी ही मुलं मरणार, तर त्यासाठी आपण कशाला मरा, असा सल्ला कुटुंबीयांनी दिला. तो तिनं धुडकावला आणि मुलांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना शिक्षण आणि डोक्‍यावर छप्परही मिळवून दिलं. आपल्या मुलांना आजार नाही तर त्यांना जगण्यासाठी रक्ताचीच आवश्‍यकता आहे, या सकारात्मक दृष्टिकोनातून ती दोन मुलांचा सांभाळ करते आहे, परिस्थितीशी आणि आप्तांशी लढत.

मध्य प्रदेशातील सतना गावच्या ठाकूर घराण्यातील लक्ष्मीला पहिला मुलगा झाला. तो आजारी पडू लागला. सततचा ताप आणि जुलाबानं हैराण होत होता. त्याचं वजनही घटलं. गावातील डॉक्‍टरांनी तिला सांगितलं, "मुलाचं रक्त बदलावं लागंल. त्यासाठी मुंबईला न्यावं लागंल.' थॅलेसेमिया नावाच्या खलनायकाशी लक्ष्मीची झालेली ही पहिली मुलाखत. त्यानंतर लक्ष्मीनं मजूर नवऱ्यासोबत मुलाला मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात आणलं. तिला आणि तिच्या नवऱ्यालाही मायनर थॅलेसेमिया असल्याचं निदान डॉक्‍टरांनी केलं. साहजिकच तिचा मुलगाही थॅलेसेमिक असल्याचं आणि दुसऱ्या मुलाचा विचार केल्यास थॅलेसेमियाची तपासणी करावी, असं तिला डॉक्‍टरांनी सांगितलं.

दरम्यान, लक्ष्मीला क्षय झाला. तिची पाळी अनियमित झाल्याचं डॉक्‍टरांनी सांगितलं. त्यानंतर ती गरोदर राहिली. डॉक्‍टरांनी तिला थॅलेसेमियाची चाचणी करण्याचा सल्ला दिला; पण सासरच्यांनी असं काही होत नसतं, असं म्हणत चाचणीस नकार दिला. दुसऱ्या मुलालाही थॅलेसेमियाची शक्‍यता असल्यानं तिनं गर्भपाताचा निर्णय घेतला. नवरा आणि कुटुंबीयांनी त्यास ठाम नकार दिला. दरम्यानच्या काळात गर्भपाताची वेळ टळल्यानं लक्ष्मीनं दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ही मुलगीही थॅलेसेमियाची शिकार होती.

लक्ष्मीचा नवरा बांधकाम मजूर आहे. या दुसऱ्या थॅलेसेमिक मुलावर उपचार शक्‍य नसल्यानं त्यानं "मी थकलोय धावपळ करून, त्यांना मरू दे,' असं लक्ष्मीला सांगितलं. तिचा सख्खा भाऊ म्हणाला, "ज्यांच्यामुळं त्रास होतो ती मुलं काय कामाची. त्यांना रेल्वे रुळावर फेकून दे.' लक्ष्मीनं घर सोडलं आणि मुंबईत मैत्रिणीसोबत राहू लागली. सुरवातीला ती मस्जिद बंदरला फुटपाथवर राहायची. त्यानंतर रुग्णालयात येणाऱ्या महिलेसोबत भाडेकरू म्हणून राहू लागली. पहिल्या मुलावर उपचारासाठी ती मुंबईत आली तेव्हा केलेल्या प्रवासातून तिला थोडीफार मुंबई कळली. घर सोडल्यानंतर मात्र ती मुंबईशी अगदी एकरूप झाली. घरकाम करत मुलांचा सांभाळ करतेय. थॅलेसेमियानामक शत्रूशी एकाकी लढत आहे.

आपल्या मुलांनी शिकावं, असं लक्ष्मीला वाटतं. तिचा मोठा मुलगा आशिष (वय 17) आणि मुलगी रिया (वय 11) या दोघांना जन्मापासून रक्त द्यावं लागतंय. आशिषला दहा दिवसांतून एकदा रक्त चढवावं लागतं. औषधांमुळं त्याचा एक डोळा, एक पाय आणि हात निकामी झालाय. थिंक फाउंडेशनच्या विनय शेट्टींशी ओळख झाल्यानंतर लक्ष्मीला मुलांसाठी लागणारी औषधं मोफत मिळू लागली. विनय शेट्टी सांगतात, "लक्ष्मीला मी मदत केली; पण तिनं जिद्दीनं आणि मेहनतीनं दुःखाशी दोन हात केलेत.'

लक्ष्मीनं दोन मुलांसह घर सोडल्यामुळं तिनं घरातून सोने-चांदी चोरून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. दोन आजारी मुलांना घेऊन ती मध्य प्रदेशातील न्यायालयाच्या तारखांना हजर राहते. पैसे नाहीत, दोन आजारी मुलांना घेऊन रेल्वेचा प्रवास. हा खटला मुंबईत चालविण्याची विनंती तिनं न्यायालयात केली. तिच्या नवऱ्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायालयानं 1200 रुपये पोटगीचा आदेश दिला. अर्थात, लक्ष्मीनं पोटगी नाकारली. ज्यानं बाप या नात्यानं मुलांना सांभाळणं नाकारलं त्याचा पैसा नको, अशा निश्‍चयानं तिनं त्याच्याशी फारकत घेतली.

रडून कोणाला दाखवायचं?
डोळे पुसणारं कोणीच नाही, रडून कोणाला दाखवायचं. मुलांसमोर रडले तर आईला त्रास देतोय, अशी त्यांची समजूत होईल. जे होतं ते झालं. त्यासाठी नशिबाला का दोष द्या? मुलांना सांगते शिका आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. मी मेल्यानंतर मुलांच्या डोक्‍यावर छप्पर हवं म्हणून त्यांच्यासाठी पै-पै जोडून दिव्यामध्ये घर घेतलंय. आजही त्यांच्यासाठी मेहनत करतेय. मुलांना बजावतेय तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही. तर, तुम्हाला रक्त चढवावं लागतं.
- लक्ष्मी चौधरी

Web Title: thalassemia sickness