उड्डाणपुलांनंतरही कोंडी कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांचे उद्‌घाटन झाले; परंतु या मार्गावरून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील वळणामुळे आणि रबाळे येथील टी-जंक्‍शनमुळे रबाळे ते ऐरोलीदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नवीन उड्डाणपुलांनंतरही येथील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. 

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने घणसोली आणि पावणे येथील सविता केमिकल कंपनीजवळ उड्डाणपूल बांधले आहेत. महापे येथे भुयारी मार्ग बांधला आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे उद्‌घाटन झाले. यामुळे बेलापूरहून ठाणे अथवा मुलुंड येथे जाणारी वाहने दहा ते पंधरा मिनिटांत रबाळेपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. मात्र रबाळे येथे त्यांना ब्रेक लागत आहे. 

ठाणे-बेलापूर मार्गावरून एमआयडीसीत जाण्यासाठी भूषण हॉटेल जवळच्या टी-जंक्‍शन आणि त्यापुढे ठाणे-बेलापूर मार्गावरून ऐरोलीमार्गे मुलुंड व त्यापुढे जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपुलाखालून असलेला मार्ग, या दोन्ही ठिकाणी अनेक वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. यात वाहनचालकांचा वेळ खर्ची पडत आहे. ऐरोलीत जाण्यासाठी भारत बिजली कंपनीसमोर असलेल्या वळणावरही काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. 

मुंब्रा बायपासचा परिणाम 
मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीसाठी दोन महिने बंद केल्यामुळे, तसेच त्या मार्गावरील वाहतूक ऐरोली-रबाळेमार्गे वळवल्यामुळे रबाळे-ऐरोली या ठिकाणी काही प्रमाणात कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मुंब्रा बायपास मार्ग पूर्ववत सुरू झाल्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या काही ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असली तरी ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Thane Belapur traffic jam