मुख्य सूत्रधाराला हुबळीतून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 96 पेट्रोल पंपांवर छापे

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 96 पेट्रोल पंपांवर छापे
ठाणे - पेट्रोल पंपांच्या मशिनमध्ये तांत्रिक फेरफार करून त्याद्वारे पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांना यश मिळाले असून, यातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर याला हुबळी येथून अटक केली आहे. पोलिसांनी 16 जूनपासून सुरू केलेल्या धडक कारवाईमध्ये 16 जिल्ह्यांतील सुमारे 96 पेट्रोल पंपांवर छापे टाकले. या चोरीसाठी चीनमधून मायक्रोचिप आणण्यात आल्या असून, त्या भारत आणि चीनबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि अबुधाबीमध्येही पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या देशांमध्येही अशा प्रकारे इंधनचोरी झाल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

कल्याण-शिळ रस्त्यावरील अरमान सेल्स या पेट्रोल पंपावर ठाणे पोलिसांनी 16 जूनला छापा टाकला होता. त्या वेळी पेट्रोलचोरी उघड केली होती. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये आरोपींनी प्रोग्रामिंग केलेले आयसी (चिपचा छोटा भाग) बसवून इंधनचोरी केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करत असताना अशा प्रकारे राज्याच्या कानाकोपऱ्यांत अनेक ठिकाणी इंधनचोरी सुरू असून आंतरराष्ट्रीय टोळीचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यभर छापे टाकण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांची परवानगी मागितली होती. त्यानंतर वैधमापन विभाग, पेट्रोलियम कंपन्यांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी राज्यातील 16 जिल्ह्यांतील 96 पेट्रोल पंपांवर छापे टाकले. त्या वेळी 75 पेट्रोल पंपांमध्ये अशाप्रकारचे गैरप्रकार होत असल्याचे उघड झाले.

चोरीमध्ये दोन पेट्रोलपंप मालक, सहा पेट्रोल पंप मॅनेजर, 12 तंत्रज्ञ, तीन स्वॉफ्टवेअर इंजिनिअर असा 23 जणांचा समावेश होता. यापैकी 14 जणांनी कल्याण न्यायालयात जामिनावर सुटकेसाठी अपील केले होते. या वेळी पोलिसांच्या वतीने पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी पोलिसांची बाजू मांडली. न्यायालयाने या आरोपींचे जामीनअर्ज फेटाळल्यामुळे अटक आरोपींची रवानगी कारागृहामध्ये झाली आहे.

ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की पेट्रोलपंप प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर हा मोठा मासा आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजचा आहे. त्यानेच इंधनचोरीच्या प्रकाराला सुरवात केली आहे. पेट्रोल पंप युनिटचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये तो कार्यरत होता. तो तीन पेट्रोल पंप चालवत असून, गोव्यामध्ये एक, तर कोल्हापूरमध्ये दोन पेट्रोल पंप सुरू आहेत. त्याची विवेक शेट्येसह अनेक तंत्रज्ञांची ओळख झाली आणि त्यांनी इंधन चोरीचे सॉफ्टवेअर आणि चिप्स तयार करण्यास सुरवात केली. प्रत्येक जण स्वतंत्रपणे त्याचे वितरण करत होता. त्या बदल्यामध्ये 25 ते 50 हजार रुपये मिळत होते. दर महिन्याला तीन ते पाच हजारांपर्यंत हप्ताही त्यांना पेट्रोल पंपचालकांकडून मिळत होता. अटक आरोपींपैकी 15 जण हे प्रकाश याचे साथीदार आहेत. त्यांच्यामार्फत त्याने हे तंत्रज्ञान अनेक पेट्रोल पंपांना दिले होते, असे तपासात समोर आले आहे.

ठाणे पोलिसांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 48, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या 36, भारत पेट्रोलियमच्या 8 आणि इसारच्या चार पेट्रोलपंपांवर कारवाई केली. त्यामधून 195 पल्सर बॉक्‍स, 22 सेन्सर कार्ड, 71 कंट्रोल कार्ड आणि 61 की पॅड जप्त केली आहेत. ते प्रत्येक कंपनीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पेट्रोलपंपांना पेट्रोल युनिट देणाऱ्या मिडको, गिलबर्गो आणि टोकहेम यासह अन्य दोन कंपन्यांचा या प्रकरणातील समावेशाची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.

ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पोलिस सह आयुक्त मधुकर पाण्डे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे, पोलिस उप आयुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, शीतल राऊत आणि ठाणे पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कारवाई केलेले पेट्रोल पंप
जिल्हा संख्या

ठाणे 28
रायगड 7
मुंबई 2
नाशिक 12
पुणे 12
सातारा 6
औरंगाबाद 6
नागपूर 5
कोल्हापूर 5
रत्नागिरी 2
धुळे 3
यवतमाळ 2
चंद्रपूर 2
जळगाव 2
सांगली 1