माणुसकी जपणारा आक्रमक अधिकारी

माणुसकी जपणारा आक्रमक अधिकारी

ठाणे - आक्रमक पद्धतीने प्रसंगी रस्त्यावर उतरून कामकाज करणारे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. फेरीवालांचा विषय असो अथवा अनधिकृत लेडीज बारवरील हातोडा अशा वेळी केवळ अधिकाऱ्यांना रस्त्यावर न उतरविता स्वतः रस्त्यावर उतरून काम करणारे आयुक्त म्हणून त्यांची ओळख झाली आहे. हीच ओळख कायम ठेवत ठाण्यात वेगवान रस्त्याचे जाळे विणण्यासाठी आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे; पण त्याचवेळी सामान्यांबरोबर थेट संवाद साधून माणुसकी जपणारा माणूस म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.

शहराचे नागरीकरण होताना रस्त्यावरील वाहतूक कोडींचा प्रश्‍न जटील झाला होता. अशा वेळी केवळ रस्ते दुरुस्त करून उपयोग नाही, तर रस्त्याचे नव्याने रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन त्या दृष्टीने आयुक्तांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यातून कायम वाहतूक कोंडीत अडकलेल्या पोखरण रोड क्रमांक एकने वाहतूक कोंडीतून सुटकेचा नि:श्‍वास घेतला आहे. या रस्त्यावरून जाताना खऱ्या अर्थाने मेट्रोपोलिटन शहरातून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. त्याचपद्धतीने रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे दिल्याने येथून पादचाऱ्यांना प्रवास करणे सुखकर झाले आहे. याचबरोबर या परिसरावर कायमस्वरूपी देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा बसवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तजवीज करण्यासाठी आयुक्तांचा पाठपुरावा सुरू आहे. 

धडाडीची कामे करतानाच पालिका शाळेच्या कार्यक्रमात गरीब मुलीचे नाक कुरतडलेले आढळल्यानंतर आयुक्तांमधील त्यांच्यातील बाप माणूस तत्काळ जागा झाला आणि त्यांनी या मुलीच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलला. रस्ता रुंदीकरणात अनेकांची घरे तोडण्यात आल्यानंतर यापैकी अनेक वयोवृद्ध महिलांना त्यांनी स्वखर्चाने आर्थिक मदत करण्यास मागे पुढे पाहिले नाही; पण त्याचवेळी ज्या वेळी लेडीजबार विरोधातील कारवाई दरम्यान त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तो झुगारुन त्यांनी लेडीजबार जमीनदोस्त केले होते. 

शहरातील भिंती शाळकरी मुले आणि कलाकारांकडून रंगवून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पर्यावरणाचा विचार करत जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांची घरटी उभारण्यासाठी आयुक्तांनी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील नागरिकांना एका क्‍लिकवर महापालिकेच्या सर्व सेवा मिळाव्यात, यासाठी डीजी ठाणे उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या शहरात विविध ठिकाणी त्याच्या जाहिराती सुरू आहेत. यामध्ये महापालिकेचा थेट उल्लेख नसला, तरी या जाहिरातीमधील सारे विषय पालिकेशी संबंधित असल्याने डीजी ठाणे ही जाहिरात मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे. आयुक्तांच्या पुढाकारामुळेच कासारवडवली आणि कळवा पोलिस ठाणे उभारले गेले. आता पालिका पोलिसांना बुलेट मोटरसायकली देणार आहे.

महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे निर्माण व्हावीत, यासाठी टीएमटीच्या भंगार बसमध्ये ‘टॉयलेट फॉर हर’ सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मूलभूत सोई-सुविधांबरोबरच शहराला पर्यटनदृष्ट्या आकर्षक करण्यासाठी पारसिक रेतीबंदर येथे चौपाटी उभारणीच्या कामाला त्यांनी अंतिम रूप दिले आहे. 

तीन वर्षांतील          कामाचे समाधान
तीन वर्षांत मी आपल्या परीने काम केले आहे. कायम सकारात्मक भूमिकेतूनच काम करतो. नागरिकांच्या हिताचा विषय असला की, ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करतो. यापुढेही शहरात मी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहराच्या पुढील गरजा लक्षात घेऊन आतापासूनच काही प्रकल्पांच्या नियोजनास प्राधान्य देणार आहे. शहरातील नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, प्रेम यामुळे मला कायम येथे काम करण्याची ऊर्जा मिळते.
- संजीव जयस्वाल,          आयुक्त, महापालिका

महापालिकेतील कामांचा सुवर्णकाळ
३३ वर्षांतील सुवर्णकाळ आणि लक्षात राहणारे कामकाज आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात झाले आहे. केवळ मूलभूत सोई-सुविधा नाही, तर शहराच्या शहर विकासाचा विचार करताना नेहमी व्हिजन ठेवून प्रकल्प राबवणारे अधिकारी म्हणून त्यांचा ठसा उमटला आहे. प्रसंगी चार खडे बोलणारे आयुक्त चांगले काम केले, तर दिलखुलासपणे साऱ्यांसमोर कौतुक करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचा अनुभव आहे.
- प्रमोद निंबाळकर,  सहायक संचालक नगररचना

शहराचे रूपडे पालटणारे आयुक्त
ठाण्याच्या विकासाला कलाटणी देणारे आयुक्त. केवळ रस्तेच नाही, तर शहराचे रूपडे पालटण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. वेळप्रसंगी चुकले, तर बापासारखा दटवणारा आणि वेळ आली, तर आईसारखी माया करणाऱ्या आयुक्तांचा अनुभव या निमित्ताने आम्हाला आला आहे. अधिकाऱ्यांना लक्ष्य न करता त्यांच्याकडून कामे करून घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले. टीम स्पिरिटही वाढविले.
- संदीप माळवी,  उपायुक्त, महापालिका  

डॅशिंग आयुक्त अशी इमेज
डॅशिंश म्हणून महापालिका आयुक्तांची एक इमेज माझ्या मनात आहे. त्याचे कारण अतिक्रमणविरोधी कारवाई करताना अनेक वेळा अडचणी येतात. अशावेळी आमच्यासोबत रस्त्यावर उतरून काम करणारे आणि येणाऱ्या समस्यांना तोड देणारे ते आयुक्त आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे अतिक्रमणविरोधी उपायुक्त म्हणून काम करताना मला कधीही समस्या आली नाही.
- अशोक बुरपल्ले, उपायुक्त,  अतिक्रमणविरोधी विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com