सुरू झालेल्या सेवेचे भाजपकडून उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम प्रशासनाने वर्षापूर्वी सुरू केलेली कल्याण रिंग रूट महिला विशेष बस सेवा भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याची घोषणाबाजी करून मंगळवारी (ता. २५) रात्री भाजपने या सेवेचे उद्‌घाटन केले. पालिका, परिवहन समितीत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही या सोहळ्यास केवळ भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पालिका पदाधिकारी आणि परिवहन समिती सभापती, सदस्य नसल्याने दोन्ही पक्षांतील मतभेद पुन्हा समोर आले.

केंद्र, राज्यात व कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद आजही मिटलेला नाही हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. वर्षापूर्वी तत्कालीन केडीएमटी सभापती भाऊ चौधरी यांनी निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगत कोणताही गाजावाजा न करता महिला विशेष बस सेवा सुरू केली. मात्र, तिला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने त्या बस बंद करून, त्या सर्वांसाठी पुन्हा सुरू ठेवण्यात आल्या. 

तब्बल वर्षानंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा आणि भाजप परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांच्या प्रस्तावानुसार महिला बस सेवा सुरू झाल्याचे सांगत कल्याण-पश्‍चिमेतील दीपक हॉटेलजवळ कल्याण रिंग रूट महिला विशेष बस सेवेचा नारळ फोडण्यात आला. या वेळी भाजप पालिका गटनेते वरुण पाटील, वैशाली पाटील, परिवहन सदस्य सुभाष म्हस्के, कल्पेश जोशी, हेमा पवार, पुष्पा रत्नपारखी, प्रेमनाथ म्हात्रे, संजीवनी पाटील, रक्षंदा सोनावणे, साधना गायकर, श्‍वेता झा, राजाभाऊ पातकर आदी या वेळी उपस्थित होते. 

या सोहळ्यात एका कार्यकर्तीला मोह न आवरल्याने तिने चक्क चालकाच्या सीटचा ताबा घेतला. त्यामुळे बस तब्बल १० मिनिटे उशिरा सुरू झाली. या विलंबामुळे बसमधील प्रवासी त्रासल्या होत्या.

शिवसेनेला श्रेयाची गरज नाही. महिलांसाठी विशेष बस वर्षापूर्वी सुरू झाली होती. मला किंवा पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना आमंत्रण नसल्याने आम्ही गेलो नाही. भाजप परिवहन सदस्यांची भूमिका दुटप्पी आहे. सभागृहात एक अन्‌ बाहेर एक असे ते वागतात. विशेष बस सुरू झाली असताना उद्‌घाटन कशासाठी करायचे? त्यापेक्षा परिवहनच्या उपन्नवाढीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. 
- संजय पावशे, सभापती, परिवहन समिती  

वर्षा पूर्वी बस सुरू झाल्याचे मान्य आहे; मात्र त्या वेळी भाजपला श्रेय मिळू नये म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी बस सुरू केली. आमच्या महिला पदाधिकारी वर्गाचा पाठपुरावा आणि माझ्या प्रस्तावामुळे बस सुरू झाली असून शहरातील महिलांना हे माहीत होण्यासाठी उद्‌घाटन सोहळा घेतला. 
-  सुभाष म्हस्के, सदस्य, भाजप, परिवहन समिती