अंडरवल्डच्या धमकीने बांधकाम व्यवसायिकांचा मुंबई, ठाण्यातून पळ

अंडरवल्डच्या धमकीने बांधकाम व्यवसायिकांचा मुंबई, ठाण्यातून पळ
अंडरवल्डच्या धमकीने बांधकाम व्यवसायिकांचा मुंबई, ठाण्यातून पळ

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून डॉन दाऊदच्या नावाने धमक्या दिल्या जात असल्याचे पोलिस तपासामध्ये समोर आले आहे. अंडरवल्डच्या धमकीमुळे बांधकाम व्यवसायिकांनी इतकी दहशत घेतली होती की, काहींना शहर सोडून तर काहींनी व्यवसाय सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदिप शर्मा यांनी कारवाई केली होती. मुंबईतील नागपाडा येथील त्याच्या राहत्या घरातून इकबाल कासकर यास ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. बांधकाम व्यवसायिकांना धमकावून त्यांच्याकडून फ्लॅट, सोने, रोखरक्कम आणि जागांच्या किंमती कमी करण्याच्या उद्योग या मंडळींकडून सुरू होता, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिली.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची सुत्र वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांनी अंडरवल्ड विरोधातील कारवाईला सोमवारी रात्री सुरूवात केली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना धमकी देणाऱ्या दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यास अटक करण्यात आली. ठाणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची असून यामध्ये दाऊद इब्राहीमचा सहभाग आहे का? तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा असलेला सहभाग आणि त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये पैसे गुंतवले आहेत का? या विषयी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिली. यामध्ये काही नगरसेवकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यापेक्षीही मोठ्या हुद्द्यावर असलेल्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आहे. कासकर याच्यासह अन्य चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांमध्ये काही बिल्डरांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकाला धमकी...
ठाणे शहरातील एका प्रतिष्ठीत बांधकाम व्यवसायिकाने 2013 मध्ये घोडबंदर रोड परिसरात इमारत बांधण्यासाठी जागा मालकाकडून जमिनीचा विकास करारनामा करून जमीन घेतली होती. त्या जमीन मालकास जमिनीचा संपुर्ण मोबदला धनादेशाव्दारे देण्यात आला होता. सर्व परवानग्या घेऊन या ठिकाणी बांधकामाला सुरूवात झाली होती त्यावेळी काही जमीन मालकांना हाताशी धरून या जमीन इकबाल याने घेतल्याचे सांगून जमीनीचे सेटलमेंट करण्याकरता बिल्डरकडे चार फ्लॅट व 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. ही मागणी पुर्ण न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच खंडणीसाठी इकबालच्या हस्तकांनी या बांधकाम व्यवसायिकाच्या बांधकामाच्या ठिकाणी तसेच कार्यालयात येऊन धमकावले होते.

इकबाल कासकरची व्यवसायिकांना थेट फोन...
ठाण्यातील या व्यवसायिकाला कासकर याने थेट फोन करून धमकी दिली होती. अंडरवल्ड आणि दाऊदचे नाव सांगून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर भयभित झालेल्या बांधकाम व्यवसायिकाने त्याला चार फ्लॅट आणि 30 लाख रुपये देण्याचे कबुल केले. येथील एक फ्लॅट बाजार भावाप्रमाणे 5 कोटी रुपये किंमतीचा होता त्यानुसार चार फ्लॅट पैकी एक फ्लॅट कासकरच्या हस्तकाच्या नावे नोंदवण्यात आला होता. तर तीन फ्लॅट विकून उरलेली रक्कम खंडणी स्वरूपात त्याने स्विकारली होती. तसेच यापुढे ठाण्यातील जमीनींचे व्यवहास कासकर सांगेल त्या प्रमाणे कर नाहीतर ठार मारले जाईल, अशी धमकी दिली होती. अखेर या विकासकाने खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. सोमवारी या प्रकरणी कासारवडली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बहीण हसीना पारकरच्या घरून अटक...
इकबाल इब्राहीम कासकर त्यांच्या दोन साथिदारांसह नागपाडा येथील त्याची बहीण हसीना पारकर हिच्या घरी येणार असल्याचे माहिती शर्मा यांना मिळाली होती. याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमबिर सिंग, सह पोलिस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलिस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे आणि उप आयुक्त गुन्हे अभिषेक त्रिमुखे यांना कळवण्यात आली. इकबाल व त्याचे दोन साथीदार अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहीण हसीना पारकर हिचे घरी दाखल झाल्यानंतर गार्डन हाॅल अपार्टमेंट, सोफीया जुबेर रोड, नागपाडा, मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या सोबत आणखी तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आली. त्यामध्ये हसीना पारकर हीच्या दिराचाही समावेश आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील व्यापारी आणि बांधकाम व्यवसायिकांनाही धमकावल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाची धमकी अन्य कोणाला आली असल्यास पोलिसांशी संपर्क साधून आफल्या तक्रारी करा, असे आवाहन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com