कॉंक्रीटच्या रस्त्याची दुरुस्ती 

कॉंक्रीटच्या रस्त्याची दुरुस्ती 

ठाणे - ऊन-पावसाचा खेळ सुरू असताना ठाण्यातील रस्त्यांची दैना उडत आहे. गेल्या वर्षीच बनवलेल्या मुख्य बाजारपेठेतील कॉंक्रीटच्या रस्त्याला तडे जाऊन भलामोठा खड्डा पडला होता. याबाबतची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच ठाणे महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बाजारपेठेतील या रस्त्याला पडलेल्या खड्ड्याची तात्पुरती दुरुस्ती करून घेतली आहे. जुन्या पोलिस चौकीसमोरील रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यात सिमेंट आणि कॉंक्रीट टाकून हा खड्डा बुजवण्यात आल्याने तूर्तास रस्त्यावरील विघ्न टळले आहे. पालिकेने तत्काळ याकडे लक्ष दिल्याने व्यापाऱ्यांचीही कोंडीपासून सुटका झाली आहे. 

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते रुंद करून शहरातील कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. चार टप्प्यांत पार पडलेल्या या मोहिमेंतर्गत ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्याची दुकाने हटवून कॉंक्रीटचा प्रशस्त रस्ता उभारण्यात आला. गजबजलेल्या या बाजारपेठेतून टीएमटी बसची वाहतूक थेट जांभळी नाका ते ठाणे स्थानक अशी वळवून शिवाजी पथावरील कोंडी फोडली होती; मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने बाजारपेठेतील जुन्या पोलिस चौकीजवळच्या रस्त्याला मधोमध तडे गेल्याने रस्त्याची वाताहत झाली. या ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने तुरळक पावसातही या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी वाढत होती. मध्यंतरी पालिकेच्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याखालील मोठ्या गटाराची झाकणे (चेंबर) उघडण्यासाठी या रस्त्याची तोडफोड केल्याने हा रस्ता पूर्णतः खचून गेला होता. 

पुन्हा खचण्याची भीती 
रस्ता खचल्याने येथून जाणाऱ्या छोट्या वाहनांना धोका जाणवत नसला, तरी टीएमटीच्या बस मार्गक्रमण करताना चक्क हेलकावे खात जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबतची बातमी "सकाळ'च्या ठाणे टुडेमध्ये 29 जूनला "ठाण्यात कॉंक्रीट रस्ता खचला' या मथळ्याखाली प्रसिद्ध होताच महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्या निर्देशावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली. दरम्यान, तूर्तास या खड्डा सिमेंट-कॉंक्रीट टाकून बुजवला असला, तरी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास पुन्हा हा रस्ता खचण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com