जिल्हाधिकारी कार्यालयाला गळती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

ठाणे - रंग उडालेल्या ओल्या भिंती, छताच्या स्लॅबमधून कोसळणारे पाणी, पाणी साठवण्यासाठी जागोजागी लावण्यात आलेल्या बादल्या आणि भांडी, कोंदड, दमट वास एखाद्या जुन्या इमारतीत दिसणारे हे चित्र चक्क ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आहे. 

ठाणे - रंग उडालेल्या ओल्या भिंती, छताच्या स्लॅबमधून कोसळणारे पाणी, पाणी साठवण्यासाठी जागोजागी लावण्यात आलेल्या बादल्या आणि भांडी, कोंदड, दमट वास एखाद्या जुन्या इमारतीत दिसणारे हे चित्र चक्क ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आहे. 

वाढलेल्या पावसामुळे या इमारतींना मोठी गळती लागली आहे. त्याचा त्रास या भागातील कर्मचारी आणि येथे येणाऱ्या नागरिकांना होत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सरकारी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जात असले, तरी मोठ्या पावसामुळे सरकारी इमारतींची दुरवस्था झाली आहे. सतत गळणाऱ्या पावसामुळे कार्यालयात जाऊ नये, असे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाटत असून रोगराईच्या भीतीने ही कार्यालये सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी होत आहे.

जोरदार पावसामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अनेक इमारतींना तडे गेले असून अशा धोकादायक परिस्थितीत नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहे. शहरात नुकत्याच दोन धोकादायक इमारती कोसळल्या आहेत. सरकारी इमारतीही धोकादायक स्थितीत असून येथील कर्मचारी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत. धोकादायक इमारतींमधील कार्यालयांत अशी परिस्थिती असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यालाही गळती लागली आहे. शंभराहून अधिक कर्मचारी असलेल्या या भागातील छताच्या प्लास्टरला चिरा गेल्या असून ते कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कार्यालयात गेल्यानंतर तेथून शक्‍य तितक्‍या लवकर दुसऱ्या ठिकाणी कामासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न कर्मचारी करत आहेत.

चौथ्या-पाचव्या मजल्यावरील गळतीची माहिती मिळाली असून त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे. या भागात भिंतीला असलेले छिद्र बुजवण्यात येत आहेत. पावसामुळे त्यात अडचणी येत असल्या, तरी काही दिवसांत ही गळती बंद करण्यात येईल.
- वंदना सूर्यवंशी, निवासी जिल्हाधिकारी, ठाणे