न्यायालयीन दट्ट्याने फटाका मार्केट ओस 

न्यायालयीन दट्ट्याने फटाका मार्केट ओस 

ठाणे - सुरक्षेच्या कारणावरून निवासी वसाहतींत फटाके विक्री न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला देऊन याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. यावरून राजकीय फटाक्‍यांचा बार उडत असताना या निर्णयामुळे फटाके विक्रेते धास्तावले आहेत. त्यातच नागरिकांनीही फटाके खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे ठाण्यातील कोपरी फटाका मार्केट ओस पडले आहेत.

राज्यभरात विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका नाशिकमधील याचिकाकर्त्याने केली होती. त्यावरील सुनावणीमध्ये निवासी वस्तीत फटाके विक्री करणाऱ्यांवर बंदी असल्याच्या वावड्या उठताच यावरून राजकीय फटाके फुटले आणि फटाक्‍यांवर बंदी असल्याचे वृत्तमाध्यमांसह याबाबतचे संदेशही सोशल माध्यमांमध्ये पसरले. यामुळे नागरिकांनी फटाके खरेदी करण्याचे टाळल्यामुळे बुधवारी (ता.११) अनेक फटाके विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे दिसले. ठाणे पूर्वेकडील कोपरीतील घाऊक आणि किरकोळ फटाके मार्केटमध्येही दिवसभर ग्राहकांची वानवा होती. फटाके विक्रेतेही धास्तावले असून इतकी मोठी गुंतवणूक करून उभा केलेला व्यवसाय क्षणात मातीमोल होण्याच्या भीतीने व्यापारी हादरले आहेत.

या तर अफवा!   
फटाके विक्री न करण्याबाबत न्यायालयाने कुठलेही निर्बंध घातलेले नसून असे कुठलेही आदेश आलेले नाहीत. या सर्व अफवा आहेत. २५ ऑक्‍टोबर २०१६ ला उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्रीला परवाने देऊ नका, किंबहुना सुरक्षेचे निकष तपासून; तसेच पडताळणी करून परवाने द्यावेत, असे आदेश दिले आहेत. त्यावर २८ ऑक्‍टोबर २०१७ ला सुनावणी आहे, तरीही अशा प्रकारच्या वावड्या उठल्याने फटाके विक्रीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, फटाके हे दिवाळी सणाचा मुख्य हिस्सा असल्याने आम्ही सणाचे सेलिब्रेशन विकतो, असा दावा ठाणे फटाके विक्रेते असोसिएशनने केला आहे.

पालिकेकडून परवाने नाहीतच 
ठाणे शहरात कायमस्वरूपी आणि तात्पुरते परवाने असलेल्या फटाके विक्रेत्यांचा समावेश आहे. यात १५ विक्रेते कायमस्वरूपी विक्रेते आहेत; तर प्रभाग समितीनिहाय तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने दिले जातात; मात्र गेल्या वर्षी राज्य सरकारने सार्वजनिक; तसेच गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री अथवा साठवणूक करण्यासाठी परवाने न देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यंदाही पालिकेने परवाने दिलेले नाहीत, अशी माहिती पालिकेच्या परवाना विभागाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com