खारफुटीच्या नव्या झाडांसाठी जुन्या झाडांची तोड?

श्रीकांत सावंत
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

ठाणे पुर्वेतील कोपरी परिसरामध्ये गेली एक वर्षांपासून सातत्याने या भागातील खारफुटीचा विध्वंस केला जात आहे. खारफुटीची कत्तल करून महापालिका प्रशासनाने याभागामध्ये रस्ता आणि खुली व्यायामशाळा उभारली होती. याविरोधात येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणी महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाणे : ठाण्यातील कोपरी परिसरातील स्वामी समर्थ मठ रस्ता परिसरात ठाणे महापालिकेकडून खारफुटी रोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या खारफुटी रोपणासाठी या भागातील जुनी खारफुटी तोडल्याचा प्रकार ठाणे जिल्हा कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांनी उघड केला आहे. महापालिका प्रशासनाने याभागात फुटबाॅल मैदानाच्या आकाराची जमिन खारफुटी मुक्त केली असून पुन्हा नव्याने या भागामध्ये खारफुटीची छोटी रोपे लावण्याचा प्रयोग महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशिल असणाऱ्या वनस्पतीची महापालिका प्रशासनाने सुरू केल्या कत्तलीमुळे खारफुटी प्रोटेक्शन ब्रिगेडच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

ठाणे पुर्वेतील कोपरी परिसरामध्ये गेली एक वर्षांपासून सातत्याने या भागातील खारफुटीचा विध्वंस केला जात आहे. खारफुटीची कत्तल करून महापालिका प्रशासनाने याभागामध्ये रस्ता आणि खुली व्यायामशाळा उभारली होती. याविरोधात येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणी महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरण थांबण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींना वाटत होती परंतु महापालिकेच्यावतीने या भागात खारफुटीची रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी खारफुटी कक्षाकडून खारफुटींची खरेदीही करण्यात आली. परंतु अतिक्रमण झालेल्या भागातील डेब्रीज हटवून तेथील रस्त्यावर खारफुटी लावण्याची गरज असताना महापालिकेने या वृक्षारोपणासाठी चक्क खारफुटीचे जंगलच तोडून साफ केले आहे. अत्यंत दुर्मिळ आणि पर्यावरणदृष्ट्य संवेदनशिल खारफुटींची झाडे बुंध्यापासून तोडून ही जागा साफ केली आहे. विशेष म्हणजे एक फुटबाॅल मैदान होऊ शकेल इतक्या मोठ्या जागेमध्ये ही खारफुटी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या ठिकाणी लागवडीसाठी आणण्यात आलेली झाडेही याच भागत ठेवण्यात आली आहे. 

कांदळवन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खारफुटी रोपण...   
ठाणे महापालिका प्रशासनाकडून कोपरी परिसरातील खारफुटीवरील अतिक्रमण करून तयार करण्यात आलेल्या रस्तावरील भरणी दुर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या भागामध्ये विरळ खारफुटीची झाडे असून त्यामध्ये जंगली गवत वाढले होते. या भागात खाडीचे पाणी पोहचत नसल्यामुळे त्यांची वाढ होत नव्हती. त्यामुळे हे जंगली गवत दुर करून या भागात कालव्यांच्या सहाय्याने खाडीचे पाणी पोहचवण्यात येणार आहे. दोन एकरच्या या भागात खारफुटीच्या तीन प्रजातीची लागवड करण्यात येणार आहे. कांदळवन कक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने हा उपक्रम सुरू केला असून 15 आॅगस्ट रोजी त्याची सुरूवात केली जाणार आहे. यावेली कांदळवन कक्षाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहे. महापालिकेने कांदळवन कक्षाकडून 50 हजार झाडे खरेदी केली असून त्याचे पैसेही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
मनिषा प्रधान, प्रदुषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका

डेब्रीजचा भराव लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न...
कोपरी परिसरात खारफुटीवर टाकलेले डेब्रिज हटवण्याचे आदेश असतानाही ठाणे महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे डेब्रीज लपवण्यासाठीच या भागात नव्याने खारफुटीची रोपे लावण्याचा प्रयत्न करत आहे. निसर्गावरील अतिक्रमणे थांबवल्यास निसर्ग स्वत:ची काळजी घेण्यास समर्थ असतो. त्यामुळे येथील डेब्रिज आणि रस्ता हटवला तरी या भागातील जुन्या खारफुटींची चांगली वाढ होऊ शकते.  ठाणे महापालिकेच्या या कृती विरोधात आम्ही कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहोत.
रोहित जोशी, ठाणे जिल्हा कांदळवन समिती सदस्य