संकल्प देवराई अन्‌ रानभाज्यांचा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

ठाणे - शहरीकरणामुळे शेकडो झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रकार सुरू असताना मुरबाड तालुक्‍यातील 12 गावांनी देवराई उभारण्याचा संकल्प केला आहे. यापैकी दोन गावांत देवराया असून काही गावांनी नव्याने देवराई उभ्या करून हिरव्या देवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुरबाडच्या टोकावडे परिसरातील माळ गावच्या भांगवाडी या छोट्या आदिवासी पाड्यात भरलेल्या हिरव्या देवाच्या जत्रेत या गावांनी हा संकल्प सोडला आहे. या देवराया जैवविविधतेने नटवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करणार आहेत. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात पर्यावरण दिनाचा मोठा उत्सव साजरा होत असताना अनेक आदिवासी पाड्यांमध्येही प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. मुरबाड तालुक्‍यात श्रमिक मुक्ती संघटनेने 2014 पासून या उपक्रमाची सुरुवात केली असून हिरव्या "देवाची जत्रा' या नावाने हा उपक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमास वन विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग आणि आदिवासी कल्याण विभागाचे अधिकारी हजेरी लावून उपक्रमांची माहिती आदिवासींपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात. यंदा या यात्रेची मुख्य संकल्पना देवराई वाचवा, अशी होती. या उपक्रमात परिसरातील 12 गावांनी भाग घेऊन निसर्गाला वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे देवराई म्हणून राखण्यात येणाऱ्या जंगलाचा प्रत्येक घटक हा निसर्गाच्या मालकीचा असून त्यातून कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची वस्तू, फळ, फूल, लाकूड किंवा पानेही आणायची नाहीत, असा कडक निर्बंध घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे वन विभाग आणि कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या नियमावलीपेक्षाही कडक नियमावली करून या गावांनी देवराई राखण्याचा संकल्प केला आहे. सामुदायिक क्षेत्रापैकी काही हेक्‍टर जमिनी या देवरायांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती या उपक्रमासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. इंदवी तुळपुळे यांनी दिली. या उपक्रमाला ठाणे जिल्ह्याचे मुख्य वन संरक्षक सुनील लिमये आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

रानभाज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती 
हिरव्या देवाच्या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे आणल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण रानभाज्यांच्या पाककृतीचे प्रदर्शन असते. पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून उगवलेल्या रानभाज्यांच्या पाककृती आणून या महिलांनी त्याचे प्रदर्शन मांडले होते. यात 43 प्रकारच्या भाज्या आणि पदार्थांची रेलचेल येथे मांडण्यात आली होती. नैसर्गिक पद्धतीने साकारलेल्या रांगोळ्या, झाडांच्या पानांची ओळख करण्याची स्पर्धा आणि शेतकऱ्यांची विषमुक्त शेती करण्याची स्पर्धाही यावेळी झाली. 

सेंद्रिय शेतीचा पुरस्कार 
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी कृषी विभागाने या आत्मा अंतर्गत येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. आत्मा ठाणेचे प्रकल्प उपसंचालक आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुरबाडचे गोकुळ जाधव यांनी उपस्थित आदिवासींना मार्गदर्शन केले, तर यावेळी कोणत्याही खताशिवाय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विषमुक्त शेती केल्याचा पुरस्कार देण्यात आला. अशी शेती करण्यास उत्सुक मंडळींचाही यावेळी सन्मान करण्यात आला.