येऊरच्या गटारीवर करडी नजर

येऊरच्या गटारीवर करडी नजर

ठाणे - गटारीच्या निमित्ताने येऊरच्या जंगलात येऊन मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या मंडळींवर आता वन विभाग, पोलिस आणि पर्यावरण संस्थांबरोबरीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही कडक तपासणी करणार आहे. यंदा पहिल्यांदाच राज्य उत्पादन शुल्काचे पथक येऊरच्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसह त्यांच्याकडील मद्याच्या बाटल्यांची तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.

ठाण्यातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी सुरू केलेल्या ग्रीन गटारी उपक्रमाच्या माध्यमातून दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यंदा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, या भागातील तपासणी अधिक कडक करण्यात येईल, असा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नाना पाटील यांनी केला, तर यंदा पहिल्यांदाच येऊर एन्व्हॅमेंट सोसायटीच्या बरोबरीने ‘नागरिक’ आणि ‘मतदार जागरण समिती’ या दोन संस्था एकत्र येणार असल्यामुळे यंदाच्या ग्रीन गटारी उपक्रमाला विशेष महत्त्व आले असल्याचे संयोजक रोहित जोशी यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले ठाणे शहराजवळील येऊरचे जंगल अनेक वर्षे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. पर्यटक, निसर्ग अभ्यासक आणि हौशी वन्यप्रेमींबरोबरच या भागात मद्यपान करणाऱ्या मंडळींचा राबताही वाढला असून, त्यांचा उपद्रव येथील वन्यप्राण्यांना आणि येथील निसर्गाला होत आहे. मद्यपान केल्यानंतर मद्याच्या बाटल्या तेथेच टाकणे, बाटल्या फोडून काचा करणे आणि सोबतचा कचरा तेथेच टाकणे हे प्रकार वाढीस लागले आहेत. गटारीच्या रविवारी या मंडळींचा उच्छाद कमालीचा वाढतो. ठाण्यातील संस्थांनी एकत्र येऊन या भागात गटारीच्या दिवशी पाहणी केल्यानंतर त्यांना जंगलामध्ये सुमारे १३००हून अधिक मद्यपींचे जथ्थेच्या जथ्थे या भागात ओल्या पार्ट्या करताना दिसून आले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन येऊर एन्व्हॉरन्मेंट सोसायटीच्या माध्यमातून दोन वर्षांपासून या भागात ग्रीन गटारी उपक्रम राबवला. या माध्यमातून जनजागृती करणे, मद्यपींची माहिती पोलिसांपर्यंत पोहचवणे आणि रोप लागवड केली जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने ही सामाजिक संस्था वन विभाग, पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाला पत्र देऊन या भागातील मद्यपान थांबवा, अशी विनंती करत असते.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे येऊरच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी केली जाणार आहे. त्यांच्याकडे मद्य अथवा अन्य पदार्थ आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल. त्यासाठी एक पथक या भागात पाठवण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारीही या भागात भेटी देणार असून, मद्यपींवर कडक कारवाई होईल.
- नाना पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे

‘ग्रीन गटारी’ उपक्रमाचे यश
प्राण्यांसाठी राखीव असलेल्या येऊरच्या पट्ट्यामध्ये मद्यपान करून तेथे बाटल्या फोडून काचा करणाऱ्यांना वचक बसवण्यासाठी दोन वर्षांपासून आमचा व्यापक प्रयत्न सुरू आहे. यंदा या मोहिमेचे तिसरे वर्ष आहे. यात नव्या संस्था जोडल्या जात असून, अधिक व्यापक प्रमाणामध्ये कारवाई केली जाईल, अशी माहिती एन्व्हायरमेंट सोसायटी संस्थेने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com