खोली पुडी...खुशबू उडी...

श्रीकांत सावंत
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

  • ठाण्यात सुपारी किंग कंपनीकडून मुखवासाच्या जाहिराती
  • गुटखा, सुपारी आणि पानमसाला बंदीच्या पार्श्वभूमीवर सुगंधी धनाडाळची विक्री

ठाणे: 'खोली पुडी...खुशबू उडी...' या आशयाच्या जाहिराती ठाण्यातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सवांच्या ठिकाणी झळकू लागल्या असून, या जाहिराती एका सुपारी किंग कंपनीकडून दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गुटखा, सुपारी आणि पानमसाला उत्पादन आणि विक्रीस बंदी असल्यामुळे या सुपारी पाकिटांसारख्याच पाकिटांमधून आता मुखवास, धनाडाळ आणि बडीसोपच्या नावाने विक्री सुरू करण्यात आली आहे. परंतु, या मंडळींच्या जाहिरातीमुळे ठाण्यात गुटखा आणि सुपारी विक्रीला सुरूवात तर झाली नाही ना? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी 'सकाळ'शी बोलताना केवळ प्रतिबंधित पदार्थांच्या जाहिरातीस बंदी आहे. धनाडाळ, मुखवास किंवा बडिसोप या विक्रीला आणि जाहिरातीला कोणत्याही प्रकारीच बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवरात्रोत्सवात मंडपात राजकीय पक्ष, राजकारणी, चित्रपट व मालिका, उद्योजक, व्यापारी यांच्या जाहिरांती मोठ्याप्रमाणात केल्या जात असून त्यामुळे शहरभर फलकांचे विद्रुपीकरण कायम सुरू आहे. ठाणे शहरामध्ये सध्या एका सुपारी किंग कंपनीच्या जाहिरातील नागरिकांच्या लक्ष वेधत असून गुटखा, सुपारी आणि पानमसाला निर्मितीमध्ये असलेल्या या कंपनीने आता ठाण्यात मुखवासाच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. यामध्ये सुगंधी धनाडाळ, बडीसोप असल्याचा दावा या जाहिरातींमध्ये केला जात असून त्याच्या पुड्या गुटखा सदृश्य असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एकेकाळी गरब्याच्या निमित्ताने गुटख्याची मोठी विक्री केली जात होती त्यावर बंदी आल्यानंतर या मंडळींनी सुगंधी सुपारीच्या नावाने उद्योग सुरू केला होता. तर पुढे सुपारीवर बंदी आल्यानंतर पानमसाला काढण्यात आला होता. परंतु या सगळ्यामध्ये असलेले पदार्थ सारखेच असल्यामुळे या सगळ्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता या कंपन्यांनी थेट धनाडाळ, मुखवास आणि बडीसोपच्या नावाखाली जाहिराती सुरू केल्या असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पुर्वीच्या सुपारीसारख्या पुडीतून या पदार्थाची विक्री होत असून ती सुगंधी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे यामुळे तरूणाईला तंबाखुजन्य पदार्थांची व्यसन लागण्याची शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे.

धनाडाळ आणि बडीसोपच्या जाहिरातीवर निर्बंध नाहीत...
गुटखा, पानमसाला आणि सुपारीवर महाराष्ट्रात उत्पादन आणि विक्रीस बंदी असून त्यांच्या जाहिरात आढळल्यास त्यावर करवाई केली जात आहे. परंतु, धनाडाळ आणि बडीसोपच्या बाबतीत अशा प्रकारची कोणतीही बंदी नसल्यामुळे त्याच्या जाहिराती करण्यास काहीच हरकत नाहीत. परंतु, यामध्ये काही अक्षेपार्हय किंवा बंदी असला घटक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाई, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ठाणे विभागाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ठाण्यात नवरात्रीत जाहिरात जोरात...
सुपारी, गुटखा आणि पानमसाला क्षेत्रात कार्य़रत असलेल्या एका बड्या सुपारी किंग व्यवसायिकाने सध्या ठाण्यामध्ये भव्य बॅनर लावले असून, त्यातून मुखवास, बडिसोप आणि धनाडाळ विक्री करत असल्याचा दावा केला आहे. सुगंधी पुडीच्या नावाखाली सुरू असलेल्या जाहिरातीतून तंबाकू जन्य पदार्थ विक्रीचाही कट असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होऊ लागला आहे. शहरातील नवरात्रीच्या ठिकाणी या जाहिराती सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Web Title: thane news gutka advertise in thane