ठाण्यात नानाविध बाप्पांनी सजले घर 

दीपक शेलार 
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

ठाणे - ‘हा छंद जीवाला लावी पिसे...’ या गीताप्रमाणे ठाण्यातील एका अवलियाने शेकडो गणेशमूर्तींचे संकलन करून अनोखा छंद जोपासला आहे. दिलीप वैती असे या कलाकाराचे नाव असून त्याच्या या छंदामुळे त्याचे घरच बाप्पामय बनले आहे. देश-विदेशातील तब्बल ५५५ गणेशमूर्ती आणि ३५० गणेशप्रतिमा त्यांच्या घरात विराजमान झाल्या आहेत. २८ वर्षे त्यांचा हा शिरस्ता सुरू असून भविष्यात ‘सृष्टीगणेशा’ या उपक्रमाद्वारे देववृक्षाची लागवड करून पर्यावरणसंवर्धनाचा त्यांचा मानस आहे.

ठाण्यातील राबोडी या मुस्लिमबहुल भागातील दिलीप वैती कुठलेही व्रतवैकल्य अथवा उपासतपास करीत नाहीत, तरीही त्यांच्यात गणेशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या घरी पूर्वजांचा नवसाचा गणपती पुजला जात असे. याच प्रेरणेतून वयाच्या १७ व्या वर्षी १९८९ ला त्यांनी मुंबईतील प्रदर्शनातून पॉकेटमनी खर्चून शिळेची पहिली गणेशमूर्ती घरात आणली.यावरून घरात त्यांना बरीच बोलणी खावी लागल्याचे वैती यांनी सांगितले; मात्र कालांतराने संपूर्ण घरच गणेशमय झाल्याने वैती कुटुंबाची हीच ओळख बनली आहे. कलेचे भोक्ते असलेल्या दिलीप यांनी जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टस्‌चे शिक्षण घेतले असून ते पूर्ण वेळ कलाक्षेत्राशी निगडित व्यवसायात आहेत. २० ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते ३०० किलोपर्यंत आणि अर्धा इंचापासून चार फुटी गणेशमूर्तीचा संग्रह त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये व्यवस्था केली असून येथील वैशिष्ट्यपूर्ण रचनेत तब्बल ५५५ गणेशमूर्ती विराजमान आहेत. यात माती, शाडू, लाकूड, सोने-चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख-शिंपले, नारळाची करवंटी, फायबर, सिरॅमिक टेराकोटा, चायना, मार्बल, मशरूम, दगड, काच अशा विविध प्रकारांतील गणेश आहेत. आरामात पहुडलेले गणराय, क्रिकेट खेळणारे बाप्पा, सभागायन करताना, खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, व्यायाम करताना, मूषकराजांच्या शाळेत शिकवताना, आदिवासी वेशात, बालरूपातील लोभस गणेशाच्या मूर्ती मन मोहून घेतात. त्यांच्या या संग्रहालयात जपान, इंडोनेशियासह कंबोडिया आदी देशातील आणि भारतभरातील मूर्तींचा समावेश आहे. वैती यांनी कॅनव्हॉसवर चितारलेल्या पुरुष गणपतीचे चित्र विलक्षण असून त्यांनी साकारलेल्या गणेशाच्या तब्बल ३५० प्रतिमांचा खजिना त्यांनी जीवापाड जपला आहे.

प्रदर्शनातून आणि दुकानातून आणलेल्या मूर्तींनी आज संपूर्ण घरच बाप्पामय बनले आहे. हा संग्रह जोपासताना प्रत्येक गणेशमूर्तीची देखभालही काळजीपूर्वक करावी लागते. पंधरवड्यातून एकदा बहीण अर्चनासह सर्व मूर्ती पाण्याने धुऊन-पुसून ठेवल्या जातात. भविष्यातही निसर्गाच्या वातावरणात एखादी गणेशमूर्तींची कार्यशाळा भरवण्याचा मानस आहे.
- दिलीप वैती, गणेशमूर्ती संग्राहक.