इक्‍बाल दाऊदची पत्नी मेहजबीनच्या संपर्कात! 

इक्‍बाल दाऊदची पत्नी मेहजबीनच्या संपर्कात! 

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन दुबईला आलेली असताना तिच्याशी फोनवरून संपर्क झाल्याची कबुली दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकर याने पोलिसांकडे दिली. दुबईमध्ये इक्‍बालची पत्नी आणि मुलांना मेहजबीन भेटली होती, असे त्याने पोलिसांना सांगितले; तर दुसरा भाऊ अनीस अहमद हा ईद आणि सणांना फोन करत असे आणि त्याच्याशी संपर्कात होतो, असे इक्‍बालने म्हटले आहे. दरम्यान, गतवर्षी दाऊदची पत्नी मेहजबीन मुंबईत येऊन गेल्याच्या चर्चेला आज उधाण आले होते. 

ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सोमवारी रात्री इक्‍बाल कासकरला अटक केली होती. ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी इक्‍बालची चौकशी सुरू केली आहे. या वेळी प्रकृतीचे कारण सांगून चौकशीला असहकार्य करण्याचा प्रयत्न इक्‍बालकडून केला जात आहे. इक्‍बालचे दाऊदशी असलेल्या संबंधाची पोलिसांकडून तपासणी सुरू असली तरी 2003 पासून त्याच्याशी संपर्क नसल्याचा दावा इक्‍बालने केला आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये दाऊदच्या पत्नीने इक्‍बालच्या पत्नी आणि मुलांची भेट घेतली तेव्हा फोनवरून दुवा देण्यासाठी बोलणे झाल्याचे इक्‍बालचे म्हणणे आहे. 2016 मध्ये दाऊदची पत्नी मेहजबीन भारतात आली असल्याच्या तर्कांना उधाण आले होते. एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारावेळी ती आली होती. त्या वेळी तिने इक्‍बालची भेट घेतली होती. काही दिवसांसाठी ती वर्सोव्यात वास्तव्यास होती. ती पाकिस्तानच्या पासपोर्टच्या आधारावर भारतात आली होती, अशीही माहिती कासकरने दिल्याच्या अफवा माध्यमांत रंगल्या होत्या; परंतु पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार देऊन असे काही घडल्याची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com