पालिकेच्या सभेतून फेसबुक लाईव्ह!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेतून शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आपली तहकुबी मांडताना चक्क ‘फेसबुक लाईव्ह’ केले. आपण सभागृहात फेरीवाल्यांच्या विषयावर जे बोललो ते सर्व नागरिकांना कळावे, हा यामागचा उद्देश असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. 

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेतून शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आपली तहकुबी मांडताना चक्क ‘फेसबुक लाईव्ह’ केले. आपण सभागृहात फेरीवाल्यांच्या विषयावर जे बोललो ते सर्व नागरिकांना कळावे, हा यामागचा उद्देश असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. 

पालिकेच्या सभेत मांडण्यात येत असलेला प्रत्येक विषय हा सार्वजनिक होतो. माहितीच्या अधिकारात सभेतील सर्व माहिती सीडी स्वरूपात उपलब्ध असते. आम्ही सोशल मीडियाचा आधार घेत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न केला, असेही म्हात्रे यांनी सांगितले. फेरीवाल्यांचा विषय अतिशय संवेदनशील आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागत असल्याने आंदोलन करून विषय सोडून दिला नसून त्याचा पाठपुरावा करत असल्याची माहिती या लाईव्हमधून दिल्याची भूमिका म्हात्रे यांनी मांडली. दरम्यान, या लाईव्हबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र हरकत घेतली असून महापौरांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. 

पालिकेच्या कायद्यात या प्रकारच्या घटनेबाबत कोणतेही मार्गदर्शन नाही. पालिकेची नियमावली ज्या वेळी तयार करण्यात आली, त्या वेळी सोशल मीडिया नसल्याने सभागृहात घडणाऱ्या घटनांबाबत पीठासीन अधिकाऱ्यांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे सचिव कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियाबाबत कायद्यात ज्या तरतूद करण्याची आवश्‍यकता आहे, त्या सरकारी पातळीवर केल्या जातील. मात्र अशा प्रकारे जर एखाद्या लोकप्रतिनिधीला काही लाईव्ह करायचे असेल तर त्याची त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना द्यायला पाहिजे. प्रसिद्धिमाध्यमे त्यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी देत असतात, त्याचा त्यांनी वापर करावा.
- राजेंद्र देवळेकर, महापौर.