चारवर्षीय मुलाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षेची सुनावणी

ठाणे : चार वर्षाच्या मुलाला जबर मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्या अमिर इस्माईल सय्यद उर्फ बिल्ला (25) या आरोपीस ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश पी. आर. कदम यांनी ही शिक्षा सुनावली.

सरकारी वकील म्हणून अॅड. संगिता फड यांनी काम पाहिले. न्यायालयाने तेरा साक्षिदारांची साक्षी नोंदवली होती. या प्रकरणातील तक्रार करणारी मुलीची आई फातमा शेख हीने न्यायालयामध्ये साक्ष फिरवली परंतु मुलाची बहिण नगमा (13) हिने दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. आरोपीने नगमा हिला देखील मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयाने 5000 रुपयांचा दंड आणि जन्मठेप तर नगमा हिला मारहाण केल्या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा आणि 3000 रुपये दंड सुनावला आहे. 

मुंब्रा-कौसा येथील चांदनगर येथे फातमा नजीब शेख ही महिला तीच्या तीन मुलांसह राहत होती. तीचा पती सोडून गेला असल्यामुळे तीचे अमिर इस्माईल सय्यद उर्फ बिल्ला याच्याशी शारिरीक संबंध होते. लैंगिक संबंधाच्यावेळी या तीन मुलांचा अडथळा येत असल्यामुळे अमिर या मुलांवर राग ठेवून होता. 8 जुन 2015 रोजी सकाळी नाष्टा करत असताना यातील लहान मुलगा रिझवान याला उलटी झाली. त्यामुळे किळस वाटल्यामुळे रागाच्या भरात अमिर याने रिझवान यास जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या रिझवानला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले परंतु त्यात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी तक्रारदार फातमा आणि मुलाची बहिण नगमा यांची साक्ष महत्वाची मानली जात होती. परंतु फातमाने ऐनवेळी आरोपीला मदत करणारी साक्ष दिली परंतु नगमाने आपली साक्ष कायम ठेवली. जिल्हा सरकारी वकिल संगीत फड यांनी या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने अखेर आरोपीला जन्मठेप सुनावली असून 5000 चा दंड ठोटावला आहे. तर नगमाला मारहाण केल्या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा आणि 3000 रुपये दंड सुनावला आहे.