पारसिकजवळ मालगाडी घसरली

पारसिकजवळ मालगाडी घसरली

ठाणे - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरून दिव्याहून पनवेलकडे जाणाऱ्या मालगाडीचे पारसिक बोगद्याजवळ कपलिंग तुटल्याने एक डबा घसरल्यामुळे वाहतूक बंद पडली. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. या अपघातानंतर जलद मार्गावरील वाहतूक बंद करून गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास डबे जोडून जलद मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

पारसिक बोगदा ओलांडल्यानंतर पनवेलकडे जाणाऱ्या मार्गाकडे मालगाडी वळत असताना गाडीची कपलिंग (जोडणी) तुटल्यामुळेे एक डबा घसरला.  तर या अपघातानंतर इंजिन व डबे पुढे निघून गेले, तर उर्वरित गाडी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदमार्गावर खोळंबून पडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे व कळवा स्थानकातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली, तर गाडीच्या मागे अडकलेल्या दोन लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून रेल्वे रुळावरून चालत ठाणे स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरू केला. लोकलबरोबरच पाटलीपुत्र एक्‍स्प्रेसही अडकून पडली होती. त्यातील प्रवाशांनाही सामानासह पायपीट करावी लागली.

या मालगाडीला बाहेर काढण्यासाठी कळवा कारशेडमधून दोन रेल्वे इंजिन आणण्यात आले. त्यानंतर मालगाडीलगतच्या ट्रॅकवर नेण्यात आली. तोपर्यंत वाहतूक धीम्या मार्गावरून वळविण्यात आली. त्यामुळे धीम्या मार्गावर मोठ्या प्रमाणात ताण आला. रात्री उशिरापर्यंत मुंबईतील सीएसटीएम, भायखळा, दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांमध्ये गर्दी उसळली होती.

ट्रॅकवरील जीवघेणा प्रवास
पारसिक बोगदा ओलांडल्यानंतर मालगाडी बंद झाल्यामुळे लोकल गाड्या पारसिक बोगद्यामध्येही अडकून पडल्या होत्या. पुढे काय झाले याचीही कल्पना प्रवाशांना येत नव्हती. अखेर जीवाची जोखीम घेऊन प्रवासी रेल्वे रुळावर उतरून ठाणे स्थानकाकडे प्रवास करू लागले. या प्रवाशांना ट्रॅकवरून जीवघेणा प्रवास करावा लागला.

लोकल गाड्यांचा ‘रिटर्न’ प्रवास
दिव्याकडून सुटलेल्या दोन लोकल मालगाडीच्या मागोमाग मुंबईच्या दिशेने जात होत्या. रेल्वेचे इंजिन आल्यानंतर या गाड्या मुंबईकडे नेण्याऐवजी पुन्हा दिव्याच्या दिशेने परत नेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा त्यांना धीम्या मार्गावर वळवून मुंबईकडे रवाना करण्यात आले. मध्य रेल्वेच्या मार्गावर अशा प्रकारे पहिल्यांदाच लोकल गाड्यांचा परतीचा प्रवास झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com