ठाण्यात खड्ड्यांमुळे प्रवास खडतर

ठाण्यात खड्ड्यांमुळे प्रवास खडतर

ठाणे - शहरातील बहुतांश प्रमुख रस्ते कोट्यवधी खर्चून सिमेंट-काँक्रीटचे बनवले असले तरी, सर्व्हिस रोड आणि काही इतर रस्त्यांची संततधार कोसळणाऱ्या पावसाने चांगलीच पोलखोल केली आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी, महात्मा गांधी रोड, के. व्हिला रोड, नितीन कंपनी, तीनहात नाका, कॅडबरी जंक्‍शन, गोखले रोड, लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, कळवा, पारसिकनगर ते मुंब्रा आणि कापुरबावडी, बाळकुम या भागांत प्रामुख्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ठाण्यातील नागरिकांचा प्रवास खडतर बनला आहे. खड्डयांमुळे वाहतूक कोंडी वाढली असून, एखादा अपघात घडून वाहनचालकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का, असा प्रश्‍न संतप्त नागरिकांनी केला आहेत.

काही दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील बहुतांश ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना सुरू आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडून कोंडीत भर पडत आहे. वाढत्या नागरीकरणात दुचाकी-तिचाकींसह सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या टीएमटी बसचीही संख्याही वाढली असल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. कॅसलमिल ते महात्मा गांधी रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तर भास्कर कॉलनी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नेहमी वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या गोखले रोडवर ठाणे महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पाचे काम रखडल्याने वाहने हाकताना चालकांना कसरत करावी लागत आहे. याच भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असल्याने ठाणेकरांना दुहेरी कोंडीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत आहे. तीनहात नाका ते नितीन जंक्‍शनमार्गे लोकमान्यनगर, किसननगर, वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहे. अशीच अवस्था सावरकरनगर, कामगार चौक, यशोधननगर, वर्तकनगर-शास्त्रीनगर या भागांतील रस्त्यांची झाली आहे. 

सभेतही गाजले खड्डे पुराण
नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी रस्त्यांचे खड्डे पुराण काढून प्रशासनाला लक्ष्य केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मास्टिक अस्फाल्ट आणि इतर प्रकारे रस्त्यांची उभारणी केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याची बाब नगरसेवकांनी उघड केली होती. त्यानुसार, महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सबंधित ठेकेदारांची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शिवाय, दर वर्षीप्रमाणे पालिकेने प्रभाग समितीनिहाय २५ लाखांची तरतूद केली असतानाही हा निधी कुठे खर्च होतो, असा प्रश्‍न सामन्यांना पडला आहे.

खड्ड्यांसह सेल्फी पाठवा पाच हजार मिळवा
ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात अभिनव ‘संगीत आंदोलन’ छेडल्यानंतर ठाणे शहर मनसेने खड्ड्यांबाबत एक अभिनव क्‍लृप्ती लढवली आहे. त्यानुसार शहरातील खड्ड्यांसोबत स्वत:चा सेल्फी काढून thaneshaharmns@gmail.com येथे ई-मेल पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उत्कृष्ट सेल्फीला पाच हजारांचे पारितोषिक देण्याचे आवाहन मनसेने सोशल मीडियाद्वारे केले आहे. जेणेकरून सर्व महाराष्ट्राला कळू द्या की, ठाणे हे तलावांचे शहर नसून खड्ड्यांचे शहर आहे, अशी मल्लिनाथीही मनसेने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com