ठाण्यात सार्वजनिक शौचालय गायब

ठाण्यात सार्वजनिक शौचालय गायब

ठाणे - स्मार्ट शहराची स्वप्ने पाहणाऱ्या ठाणे महापालिकेच्या बिल्डरधार्जिण्या धोरणाचा फटका गोरगरीब नागरिकांना बसल्याचे समोर आले आहे. वागळे इस्टेट रोड नं. ३३ वरील झोपडीवासीयांच्या सुविधेसाठी पालिकेने उभारलेले वापरातील सार्वजनिक शौचालय अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. 

हे शौचालय तोडण्यात आले असतानाही, माहितीच्या अधिकारात हे शौचालय जमीनदोस्त केले नसल्याचे उत्तर देऊन दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे बिल्डरच्या सोईसाठीच शौचालय गायब केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, स्थानिकांनी या शौचालयासाठी पालिका प्रशासनाकडे तक्रार करून शौचालय उद्‌ध्वस्त करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, उपोषणाचा इशारा दिला आहे. 

वागळे इस्टेट रोड नं. ३३ वरील कामगार रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर झोपडीवासीयांसाठी महापालिकेने लाखो रुपये खर्चून सार्वजनिक शौचालय उभारले होते. या शौचालयाच्या देखभालीसाठी केअरटेकरही नेमण्यात आला होता. एक दिवस अचानक येथील शौचालय गायब झाल्याने नागरिक हबकले. शौचालय आणि शौचालयाचा केअरटेकरही गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. या शौचालयाबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, रायलादेवी प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील शौचालय जमीनदोस्त केले नसल्याचे उत्तर दिल्याने जाधव यांना धक्काच बसला. 

त्यामुळे सदरचे शौचालय तोडले कुणी? याचा शोध पालिका प्रशासनाने घ्यावा आणि तोडणाऱ्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून शौचालय पुन्हा बांधून देण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हे शौचालय तोडल्याबाबत माहिती घेण्यासाठी, तत्कालीन कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही. 

वागळे इस्टेट रोड नं. ३३ वरील शौचालयाशेजारी एमआयडीसीचा प्लॉट असून या ठिकाणी आयटी पार्कसाठी इमारत उभारली जात आहे. या आयटी पार्कसाठीच शौचालयावर हातोडा मारण्यात आला. पालिकेकडे तक्रार केली असता, अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आश्‍वासन दिले; मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.
- रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्तेवागळे इस्टेट रोड नं. ३३ वर सार्वजनिक शौचालय उभारले, तेव्हा तत्कालीन अभियंता रवींद्र शिंदे होते. त्यांच्याच कार्यकाळात तीन महिन्यांपूर्वी शौचालय तोडण्यात आले. याबाबत शिंदेच  अधिक माहिती तेच देऊ शकतील.
- धनंजय गोसावी, कार्यकारी अभियंता, वागळे प्रभाग
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com