आता कळणार रानभाज्यांचे ‘मूल्य’ 

श्रीकांत सावंत 
सोमवार, 12 जून 2017

ठाणे - आदिवासींप्रमाणेच जंगलातील रानभाज्या आणि रानमेवा दुर्लक्षित झाला आहेत. रानभाज्यांना शहरी भागात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मुरबाडच्या आदिवासी महिला सातत्याने प्रयत्न करत आहेत. रानभाज्या पाककृतींच्या स्वरूपात शहरात पोहोचवण्याचा प्रयत्न मुरबाडच्या श्रमिक मुक्ती संघटनेने सुरू केला आहे. 

ठाणे - आदिवासींप्रमाणेच जंगलातील रानभाज्या आणि रानमेवा दुर्लक्षित झाला आहेत. रानभाज्यांना शहरी भागात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मुरबाडच्या आदिवासी महिला सातत्याने प्रयत्न करत आहेत. रानभाज्या पाककृतींच्या स्वरूपात शहरात पोहोचवण्याचा प्रयत्न मुरबाडच्या श्रमिक मुक्ती संघटनेने सुरू केला आहे. 

चार वर्षांत या भागातील आदिवासी महिलांनी ५८ प्रकारच्या रानभाज्यांचा शोध घेतला असून, आता त्यांचे पोषणमूल्य तपासण्याचा प्रयोग सुरू आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ आणि पुण्याच्या आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे. यामुळे आदिवासींना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला होऊ शकणार आहे.

औषधी गुणांनी युक्त आणि आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या रानभाज्यांच्या नानाविविध चवींमुळे त्यांची वेगळी ओळख आहे. जंगलांबरोबर रानभाज्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून, त्यांचे गुणधर्मही विस्मृतीत जाऊ लागले आहेत. हा ठेवा टिकवण्यासाठी मुरबाडजवळच्या आदिवासी गावांत नवे प्रयोग सुरू आहेत. 

 श्रमिक मुक्ती संघटनेने या महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी रानभाज्यांच्या विक्रीचा प्रयत्न सुरू केला आहे. हिरव्या देवाच्या जत्रेच्या निमित्ताने रानभाज्यांचे विविध प्रकार आणि पाककृतींची निर्मिती केली जात असून, त्याच्या स्पर्धाही होतात. या भाज्यांची आहारातील उपयुक्तता लक्षात आल्यास रानभाज्यांचे महत्त्व शहरी नागरिकांनाही जाणवेल. त्यासाठीच संस्थेने या रानभाज्यांचे पोषणमूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाज्यांचे आहारमूल्य लक्षात आल्यास भाज्यांना वैज्ञानिक महत्त्व मिळून त्याचा फायदा आदिवासी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी होऊ शकेल, अशी माहिती या भागात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांनी दिली.

आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटची मदत
मुरबाड येथील रानभाज्यांची यादी आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे पाठवून त्यांच्या आहार घटकांची आणि पोषणमूल्याची माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी रानभाज्यांची संख्या, नावे, छायाचित्रे, भाज्यांचा खाण्यासाठी वापरला जाणारा भाग आणि त्याची शिजवण्याची पद्धत यांचे संकलन सुरू आहे. या उपक्रमासाठी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ आणि मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये कार्यरत काही न्युट्रीशनिस्टचीही मदत घेतली आहे, अशी माहिती ॲड्‌. सुरेखा दळवी यांनी दिली.