रिक्षा-टॅक्‍सीसाठी माहिती फलक सक्तीचा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

ठाणे - ठाण्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्‍सीच्या दर्शनी भागात चालकांची पूर्ण माहिती, वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि अन्य महत्त्वाची माहिती लावण्याची अधिसूचना वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक रिक्षा आणि टॅक्‍सीमध्ये बसल्यानंतर वाहनचालकाची पूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे. अशा प्रकारचे फलक नसलेली रिक्षा प्रवासी वाहतूक करण्यास अपात्र असून त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आल्याची अधिसूचना पोलिसांकडून काढण्यात आली आहे. महिला प्रवाशांवर रिक्षाचालकांकडून होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.   

ठाण्यात रिक्षाचालकांकडून महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील रिक्षा प्रवास महिलांसाठी धोक्‍याचा बनत चालला आहे. दोन आठवड्यांपूर्वी एका डायटिशन महिलेचा रिक्षाचालकांनी विनयभंग करून तिला रिक्षातून फेकले होते. या पार्श्वभूमीवर जागरूक पोलिसांनी रिक्षांमध्ये चालकांची माहिती दर्शनी भागामध्ये लावण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर यांनी शहरातील रिक्षांमध्ये स्मार्ट कार्डच्या माध्यमातून रिक्षांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्या वेळी फक्त १५०० रिक्षांमध्येच असे स्मार्ट कार्ड बसवण्यात आले होते.  उर्वरित २० हजार रिक्षांमध्ये अद्यापही स्मार्ट कार्ड बसवण्यात आले नाही. 

रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसवण्यासाठी त्या वेळी रिक्षाचालकांडून फक्त १०० रुपये घेण्यात येत होते. ते भरावे लागू नयेत, यासाठी या रिक्षाचालक संघटनांनी या प्रणालीला विरोध केला होता. परंतु त्यामुळे ठाण्यातील डायटिशन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून आता रिक्षा आणि टॅक्‍सीमध्ये माहिती फलक बसवणे सक्तीचे करत असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप पालवे यांनी सांगितले. 

ही माहिती हवी 
रिक्षा-टॅक्‍सीमध्ये बसवण्यात येणाऱ्या माहिती फलकावर मोटार वाहनाचा क्रमांक, परवानाधारकाचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक, परवान्याची मुदत, मोबाईल क्रमांक, चालकाचे नाव आणि पत्ता, वाहनचालक परवाना क्रमांक, चालक परवाना मुदत, वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक, पोलिस मदत क्रमांक १००, महिला हेल्पलाईन क्रमांक १०३, पोलिस मदतीसाठी एसएमएस क्रमांक  ९९६९७७७८८८ आणि आरटीओ हेल्पलाईन क्रमांक १८००२२५३३५  असणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारचे माहिती फलक न लावणाऱ्या रिक्षा कायद्यानुसार शिक्षेस पात्र ठरणार असून अशा रिक्षांमध्ये प्रवाशांनी बसू नये, असे आवाहन सह पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी केले आहे.