ट्रान्स्फॉर्मर केंद्राने घेतला मोकळा श्‍वास 

ट्रान्स्फॉर्मर केंद्राने घेतला मोकळा श्‍वास 

ठाणे - ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे आरक्षण केंद्राच्या आवारातील महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मर केंद्राने अखेर मोकळा श्‍वास घेतला. रेल्वे आरक्षण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर परिसराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याबाबतची बातमी "सकाळ'च्या ठाणे टुडेमध्ये आज (ता.23) प्रसिध्द होताच त्याची तातडीने दखल घेत महावितरणने आरक्षण केंद्रातील या बंदिस्त जागेत बेकायदा ठेवलेले फेरीवाल्यांचे साहित्य तातडीने हटवून परिसर स्वच्छ केला. 

ठाणे रेल्वेस्थानकातून रोज सुमारे सात लाख प्रवासी प्रवास करत असल्याने स्थानकात नेहमी वर्दळ असते. वाढत्या नागरीकरणामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाणे पश्‍चिमेकडील हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. दरम्यान, एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वेची सुरक्षा चोख सांभाळली असली, तरी काही दिवसांपूर्वी ठाणे स्थानक परिसरातील रेल्वे यार्डात सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलने पेट घेतल्याने पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. त्यानुसार, ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील; तसेच रेल्वे आस्थापनामधील राडारोडा आणि कचरा हटवण्यात आला होता; मात्र ठाणे पश्‍चिमेकडील रेल्वे स्थानकानजीकच्या रिक्षा थांब्याजवळ असलेल्या रेल्वेच्या आरक्षण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर केंद्राच्या जागेत फेरीवाल्यांचे सामानसुमान बेकायदा ठेवल्याने महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मर परिसराची सुरक्षा धोक्‍यात आली होती. या केंद्रात घुसखोरी सुरू असल्याने अतिउच्च दाबाच्या विद्युत जनित्रामध्ये छेडछाड होऊन आग लागण्याची अथवा अतिगंभीर प्रसंग उद्‌भवण्याची शक्‍यता होती. याबाबतची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरण प्रशासनाच्या भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. संबंधित परिसर स्वच्छ व सुरक्षित करून घेतला. दरम्यान, ट्रान्स्फॉर्मर परिसरात अतिउच्च दाबाचा विद्युतप्रवाह वाहत असल्याने या विद्युत यंत्रणापासून दूर व सुरक्षित राहण्याचे; तसेच कोणतीही छेडछाड न करण्याचे आवाहन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्‍वजीत भोसले यांनी केले आहे. 

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील आरक्षण केंद्रात तिकिटांची आगाऊ बुकिंग करण्यासाठी रोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. या केंद्राच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या ट्रान्स्फॉर्मर परिसराची साफसफाई महावितरणने केल्याने उर्वरित अडथळे तातडीने दूर केले जातील. आरक्षण केंद्राशेजारील अतिक्रमणेही हटवली जातील. 
- सुरेश व्ही. नायर, ठाणे रेल्वे स्टेशन डायरेक्‍टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com