सकस माध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थी सुखावले

सकस माध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थी सुखावले

ठाणे - अन्न मिळत नाही म्हणून शाळेकडे पाठ फिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटभर सकस भोजन मिळू लागल्याने ठाणे महापालिकेच्या शाळांचे पट वधारले आहेत. अक्षयपात्र फाऊंडेशन या ‘नॉनप्रॉफिट’ संस्थेमार्फत १३३ पैकी २६ पालिका शाळांत हा उपक्रम सुरू झाला आहे. यातून सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना मोफत माध्यान्ह भोजन दिले जाते. ठाण्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला आहे. अक्षयपात्र संस्थेने पवारनगर येथील पालिका शाळेतील जागेत आधुनिक स्वयंपाकगृह उभारले आहे. पालिकेच्या इतर शाळांसह ठाण्यातील इतर अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाही मोफत भोजन देण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला.

पालिकेच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या १२७ शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्याने या पालिका शाळांमधील पटसंख्या घसरू लागली. त्यातच पालिका शाळेत येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भोजनाची आबाळ होत असल्याने त्यांनीही शाळेकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती. ही बाब हेरून पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात उद्‌घाटन केलेल्या अक्षयपात्र संस्थेशी संपर्क साधून मोफत माध्यान्ह भोजनाचा हा उपक्रम ठाण्यात सुरू केला आहे. 

पालिकेच्या पवारनगर येथील शाळा क्रमांक ३३च्या इमारतीत आधुनिक स्वयंपाकघर असून, सर्वकाही यांत्रिक पद्धतीने होते. एका वेळेस पाच ते सहा हजार पोळ्या तयार करण्याचे यंत्र असून, अगदी धुणीभांडी करण्याचे कामसुद्धा यांत्रिक पद्धतीने होते. तूर्तास ही जागा स्वयंपाकासाठी अपुरी पडत असून, भविष्यात भव्य स्वयंपाकघर उभारण्यासाठी संस्थेला पालिकेकडून दुसरी जागा उपलब्ध केली जाणार आहे. कुठलाही मोबदला न घेता संस्थेमार्फत सध्या माजिवडा गट, मानपाडा आणि वर्तकनगर गटातील २६ शाळांमधील आठ हजार विद्यार्थ्यांना मोफत भोजन पुरवले जाते, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.

मुंबईच्या इस्कॉन मंदिरात मिळणाऱ्या मोफत भोजनासाठी अनेक विद्यार्थी शाळा बुडवून येत असत. पुढे इस्कॉनने शाळांमध्ये मोफत भोजन सुरू केले. ही बाब तेव्हा मुंबईच्या आयआयटीमध्ये शिकत असलेल्या मधू पंडित दास यांनी हेरून त्याच धर्तीवर अक्षयपात्र फाऊंडेशनद्वारे हा उपक्रम सुरू केला. आज संस्थेच्या देशभरात १२ राज्यांतील १३ हजार ६८६ शाळांतील सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांना दररोज माध्यान्ह भोजन दिले जाते. पौष्टिक आहार बनवणारी २८ सेंट्रलाईज्ड किचन असून, संस्थेने नुकतेच अन्नसुरक्षा व अन्न गुणवत्ता तपासणारी प्रयोगशाळा सुरू केली आहे.
- रामकृष्ण कामत, कार्यकारी व्यवस्थापक, अक्षयपात्र फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com