प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे बसला अपघात

प्रमोद पाटील
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

'आम्ही अनेक वेळा तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. 70 लाख या रस्त्यासाठी मंजूर झाले आहेत हे एक वर्षापासून ऐकतो. कोणते ना कोणते कारण सांगून वेळ मारून नेली जाते.'
- जावेद शेख, सरपंच, दांडा खाडी ग्राम पंचायत.

ठाणेः गेल्या दोन-तीन वर्षांपासून पालघर तालुक्यातील तिघरे-दांडा खाडी रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून, या रस्त्यावर आज (शनिवार) सफाळे- दांडाखाडी बस पलटी होऊन एक मोठा अपघात टळला असला तरी निद्रिस्त प्रशासन लोकांचे बळी जाण्याची वाट बघत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या दांडा-खाडी गावात ये जा करणारया राज्य परिवहन महामंडळाच्या आज दूपारी बारा वाजता सफाळे येथून सुटलेल्या बसला दांडा खाडी आणि खटाळी गावाच्यामध्ये  दूसरया वाहनाला रस्ता देताना एसटी बस खराब रस्त्यामुळे पलटी होता होता वाचली. या वेळी एसटी बसच्या वाहन चालकाने प्रसंग अवधान दाखवले नसते तर मोठी दूघ॔टना घडली असती, असे या बस मधील प्रवाशांनी सांगितले. मुंबईतील कालची घटना ताजी असतानाच या बसच्या अपघाताबद्दल परिसरातील लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून, प्रशासन लोकांचे बळी घेतल्या शिवाय रस्त्याची दुरूस्ती करणार नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर उरली-सुरली डांबर आणि मातीही धुवून गेली आहे. तिघरे, अंबोडे, खटाळी, दांडाखाडी या रस्त्याची दुरावस्था झाली असून, या रस्त्यावरून जाणे अत्यंत अवघड झाले आहे. या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे.   

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला ऐतिहासिक भवानगड तसेच निसर्ग रम्य केळवा बीच कडे तसेच पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे एडवण, दातिवरे, कोरे, मथाणे, भादवे, ऊसरणी आदी गावांमधील हजारो लोकांना अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे तिघरे-दांडा खाडी हा रस्ता होय. मात्र, गेल्या काही वर्षांत या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर या रस्त्याला डांबर तर सोडाच पण कुठून जावे हेच कळत नाही. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर असलेल्या खडयांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होऊन लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

या खड्यांमुळे गेल्या काही वर्षांपासून या भागात अनेक अपघात झाले आहेत. शेतकऱ्याला आपली बैलगाडी सुद्धा या रस्त्यावरून नेता येत नाही. रस्त्यावर पडलेल्या खडयांमुळे येथील जनजीवनावर परिणाम झाला आहे. या बाबतीत पालघर पंचायत समितीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यासाठी 70 लाख रुपये मंजूर झाले GST मुळे उशीर होत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. हेच काय अच्छे दिन? असा सवाल केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याला कोणी वाली उरला नाही. त्यामुळे येथील जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी येथील लोकांची मागणी मात्र धूळखात पडली आहे.